मुंबई महान्यूज लाईव्ह
शापूरजी पालनजी समूहाचे मुख्य वारसदार सायरस मिस्त्री यांचा पालघर जिल्ह्यातील चारोटी येथे झालेल्या अपघाती मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर समोर आले आहे.
शवविच्छेदन अहवालात प्राथमिक माहितीनुसार सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना जबर धक्का बसल्याने सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. थेट इजा न होता अत्यंत वेगाने शरीर आदळल्याने पॉलीट्रॉमा होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला.
हा शवविच्छेदनाचा अहवाल जेजे रुग्णालयाने कासा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी सायरस मिस्त्री यांच्या परिवाराशी जवळीक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका अनाहिता पांडोले मर्सिडीज बेंज गाडी चालवत होत्या.
त्यांनी अतिशय वेगाने कार चालवली. ९ मिनीटांत २० किलोमीटरचे अंतर गाडीने पार केले हाते अशी नोंद यामध्ये करण्यात आली असून चुकीच्या दिशेने वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशीही माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर महिंद्रा उद्योगसमूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी वाहनचालकांना व मालकांना मोलाचा सल्ला देत मागील सीटवरही सीट बेल्ट लावण्याचा सल्ला दिला आहे.
बहुतांश वाहनचालक हे पाठीमागील सीटच्या सीटबेल्टचा वापर करीतच नाहीत. मात्र सायरस मिस्त्री या्ंच्या अपघाताच्या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला. महिंद्रा यांनी ट्विट करीत आपण पाठीमागे बसलो, तरीही तेथे सीटबेल्ट लावतो. तुम्हीही आवर्जून लावत चला असा सल्ला दिला आहे.