राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
५ सप्टेंबर हा राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून डॉ राधाकृष्णन यांची ओळख आहे. देशाचा राजदूत, कुलगुरू व राष्ट्रपती असे अनेक पद भूषविले आहेत. त्यांचा सन्मान म्हणून शासनाने ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे.
त्यामुळे हा दिवस देशभर शिक्षक दिन म्हणून शाळा, कॉलेज, विद्यालये तसेच शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकीकडे हा शिक्षक दिन साजरा होत असताना पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी ह्या शिक्षक दिनाला विरोध दर्शवत आक्षेप घेतला आहे.
शिक्षणाचे प्रणेते व देशात पहिली मुलींची व मुलांची शाळा सुरू करणारे हे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हेच शिक्षक दिनाचे खरे मानकरी असल्याचा दावा ते करीत असून त्यांचा स्मृतिदिन हाच शिक्षक दिन साजरा करावा अशी मागणी ते गेली अनेक वर्षापासून करीत आहेत.
काल शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा खरा शिक्षक दिन नेमका कोणता डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन की महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ? हा प्रश्न उपस्थित होत असल्याने शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थीही संभ्रमात पडले आहेत. काल दिवसभर या विषयी सोशल मीडियात जोरदार वादविवाद दिसून आला. मात्र अनेकांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे व्हाट्सअप व फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्टेट्स ठेवत त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे चित्र होते.
महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. शाळेत शिकत असताना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले आहे. तर राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ साली झाला.
महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. तर मग शिक्षकदिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा कसा होतो ? हा प्रश्न पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी सोशल मीडियावर केला आहे.
राधाकृष्णन यांनी उभ्या आयुष्यात एकही शाळा सुरू केली नाही. पण त्यांच्या जन्मापुर्वी केवळ चार वर्षात महात्मा फुलेंनी २० शाळा सुरू करून विद्यादानाचे मोफत कार्य केले. राधाकृष्णन यांनी विद्यावेतन घेऊन एकाही बहुजनांच्या मुलांना शिकवल्याचा पुरावा नाही तर मग शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा करायचा का ? हा प्रश्न उपस्थित केला आहे.
जोतीरावांनी पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीमाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. त्यांच्या या कार्याला काही समाजकंटकांकडून सतत विरोध केला गेला.
महात्मा फुलेंनी ‘चूल आणि मुल’ या धर्मव्यवस्थेवर आघात करून स्वत:च्या पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन स्त्रियांसाठी देशात ०१ जानेवारी १८४८ रोजी सर्वप्रथम सुरूवात केली तसेच ‘स्त्रियांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी’ असे म्हणत तसेच त्यांनी अज्ञान, अंधश्रध्दा, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, स्त्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला तर राधाकृष्णन यांनी स्वत:च्या पत्नीला अशिक्षित ठेऊन फक्त चूल आणि मूल ही व्यवस्था सिध्द करून दाखवली तसेच ‘स्त्रियांचा जन्म सेवेसाठीच आहे’ असे त्यांचे मत होते. एकही लढा दिला नाही.
महात्मा जोतिबा फुलेंनी ‘गुलामगिरी, शेतक-याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म तसेच देशातील पहीले नाटक तृतीय रत्न लिहिले. फुलेंच्या साहित्यामुळे पुरोगामी विचारांची बिजे पेरली गेली त्यामुळे याच प्रेरणेतून अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. तेव्हा प्रतिगामी विचारांची बिजे पेरली गेली. त्यामुळे बहुजनांसाठी देशात एकही संघटना निर्माण झाली नाही.
महात्मा जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा म्हणून इंग्रजांना निवेदन दिले परंतु राधाकृष्णन यांच्याच काही समर्थक व कुंटे यांनी हंटर कमिशन आयोगास बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे सांगितले असा दावा पुरोगामी संघटनांनी केला आहे.
राधाकृष्णन यांनी राजदूत, राष्ट्रपती, कुलगुरू अशी पदे उपभोगली त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले पण महात्मा जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज संस्थापक, शिवजयंतीचे जनक, शेतकरी, कामगार, नाभिक यांच्या संघटना स्थापन करून सार्वजनिक कार्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुरस्कार नव्हे तर तिरस्कार प्राप्त झाला, परंतू महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्तम साहित्यिक, प्रतिभावंत संशोधक होते, तर राधाकृष्णन हे कसे आणि काय करत होते हे विश्वविख्यात तत्ववेत्ते आचार्य रजनीश यांनी त्यांच्या ‘संदर्भ – ज्यूं मछली बिन नीर, पृष्ठ क्र.१७०,१७१)’ या पुस्तकात लिहिले आहे.
राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते, असे त्यांचे चिरंजीव डॉ. सर्वपल्ली गोपाल सांगतात.(Ref. Radha krishna A Biography-S.Gopal) असा दावा इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे, ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके यांच्यासह अनेक विचारवंतांनी सोशल मीडियावर केला आहे. विद्यार्थी, शिक्षकांनी शाळेत, ५ सप्टेंबर ऐवजी महात्मा जोतिबा फुलेंचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा असे आवाहनही केले आहे .
दरम्यान , काल सर्वत्र शाळा ,विद्यालय, कॉलेजमध्ये डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांना अभिवादन करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचे जीवन कार्याची माहिती आपल्या भाषणातून सांगितली. तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्टेटस ठेवून त्यांचा स्मृतिदिन शिक्षक दिनाला पसंती दिल्याचे चित्र होते.