विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
एखादे विकासकाम कसे महत्वाचे असते, याचा धडा आज बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरातील अनेक वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांनी अगदी आजच घेतला. सव्वा कोटींच्या या पुलाने शेतकऱ्यांचा ३० किलोमीटरचा वेढा वाचवून सव्वा आणे काम झकास केले.. म्हणून आज शेतकरी म्हणाले, थॅंक्यू अजितदादा..!
बाबुर्डी काळा ओढ्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पुल झाल्याने गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची गैरसोय टळली. बाबुर्डीमार्गे मोरगांवला ओढ्यातून गेले, तर अवघे 5 किलोमीटर अंतर आहे. मात्र दरवर्षी पाऊस झाल्यावर बाबुर्डीच्या पश्चिमेला अगदी 500 फूट अंतरावरचा ओढा पार करून शेतात जाणे येणे करायचे म्हणले तरी जिकिरीचे व्हायचे.
अगदी गुरांचा चारा आणायचा म्हटले, तरी लोणीभापकर पाटीवरून मोरगावला अन् मग मोरगाववरून रानात यावे लागायचे. काम झाले की, परत माघारी त्याच मार्गे जावे लागायचे. यात सगळे अंतर चक्क १५ किलोमीटर जायचे आणि यायचे १५ किलोमीटर असे व्हायचे.
म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या शेतात ये-जा करण्यासाठी मिळून 30 किलोमीटर अंतराचा वेढा व्हायचा. मात्र या ओढ्यावरील पुल झाल्यानंतर गावकऱ्यांची गैरसोय पूर्णपणे दूर झाली. तत्पूर्वी या ओढ्याला पाणी आल्यावर साधारण आठवडाभर या मार्गे दळणवळण बंद पडायची.
ज्ञानेश्वर पोमणे, सरपंच बाबुर्डी (ता. बारामती)- या पुलाच्या कामाची गरज असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून देताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभिर्याने लक्ष घालून लागलीच सव्वा कोटीपर्यंतचा निधी या ओढ्यावरील पुलासाठी मंजूर केला आणि त्याचे तातडीने कामही करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले. आज या परिसरात मोठा पाऊस झाला आणि पुलाचे काम किती महत्वाचे होते याचा प्रत्यय सर्वच ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी दादांचे आभार मानले.