सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील रस्त्याच्या कामांच्या दर्जावरून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी मंत्री दत्तात्रय भरणेंवर निशाणा लावला असून भरणे यांची लोकप्रियता सध्या ज्या विषयावरून आहे, त्या सार्वजनिक रस्त्यांच्या कामांना त्यांनी लक्ष्य केले आहे.
पाटील यांनी सांगितलंय की, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाच मी इंदापूर तालुक्यात आणणार आहे आणि त्यांना येथील रस्त्यांच्या झालेल्या कामांचा दर्जा दाखवणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते वाटल्यास संबंधित ठेकेदारासहित ज्याने शिफारस केली त्यांचा नागरी सत्कार करू.
इंदापूर तालुक्यातील झालेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आता कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले आहेत. माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. इंदापूर तालुक्यात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडत आहेत.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. तर याच काळात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काम केले आहे. या काळातील तालुक्यातील झालेल्या कामांचा दर्जा तपासला जाणार असून जिथे गरज आहे तिथे काम झाले नाही फक्त ठेकेदाराला खुश करण्यासाठी कामे झाली असा आरोप पाटील यांनी केला आहे.
इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात बारामती लोकसभा मतदार संघ नियोजन तसेच केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारामन याचा 22,23 व 24 सप्टेंबर रोजी तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 6 सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदार संघ दौऱ्या वर येत आहेत.या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप सवांद बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.या वेळी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हर घर जल पेयजल योजनेबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, या योजनेत 55 ते 60% निधी हा केंद्र सरकारचा व 40 ते 45 टक्के निधी हा राज्य सरकारचा असतो. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही भाजपचेच असल्याने या योजनांचा सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीचेच आहे. यात राष्ट्रवादीचा काडीमात्र ही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.