बारामती महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या तयारीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या दौऱ्याकरीता आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी बारामती व इंदापूरमध्ये आढावा बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अमेठी घेतली..तर बारामतीचे काय घेऊन बसलात असा सवाल करीत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवला.
आज इंदापूर व बारामतीत त्यांनी धावता दौरा केला. यामध्ये त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. इंदापूरात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तर त्यांच्यासमवेत भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्य साखऱ संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, इंदापूरचे अध्यक्ष अॅड. शरद जामदार. बारामतीतील बैठकीत बाळासाहेब गावडे, बारामतीचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, कोणालाही अमेठी हा मतदारसंघ भाजप जिंकेल असे वाटले नसेल, मात्र राहूल गांधींना वायनाड शोधावा लागला. आता बारामतीतही असेच होईल. २०१४ मध्ये हरलो, २०१९ मध्ये हरलो.. मात्र आता जिंकणारच.. आम्ही खूप मते घेतली आहेत. त्यामुळे बारामतीकरांनाही आता महाराष्ट्रातला दुसऱा एखादा वायनाड शोधावा लागेल.
ते म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री बारामतीला भेट देतात, ही छोटी गोष्ट नाही. माझ्या संपर्कात थेट दिल्लीतील मुख्यालयातील पदाधिकारी आहेत. त्यावरून बारामती लोकसभेची निवडणूक किती गांभिर्याने घेतली आहे, त्याचा प्रत्यय येईल. त्यामुळे आता कोणीही आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. भाजपने ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे आणि ही निवडणूक आपण लढून जिंकणारच आहोत. २०१४ व २०१९ मध्ये आम्ही खूप मते घेतली. अगदी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. हेही विसरू नका. आता आपली ताकद वाढली आहे. आणि ती बारामतीकरांना दिसेलच.