विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
विश्वविख्यात प्लास्टीक सर्जन डॉ. शरदजकुमार दिक्षीत यांच्या स्मरणार्थ भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोफत प्लॅस्टिक सर्जरी च्या शिबिरांचे आयोजन करते. या शिबिरांमध्ये मुख्यत्वे दुभंगलेले ओठ, कान व नाकावरील बाह्य व्यंग्यावर व चेहऱ्यावरील विद्रूप डाग अशा प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येतात. याही वर्षी देशातील सात ठिकाणी हे शिबीर होणार आहे.
प्लॅस्टिक सर्जरीची आवश्यकता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे व या महागड्या शस्त्रक्रिया असल्यामुळे त्यासाठीचा खर्च पेलवत नसल्याने या शस्त्रक्रिया राहून जातात. यासाठीच अशा शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमानेच होऊ शकतात हे लक्षात घेऊन हे अभियान राबवले जाते. मागील दोन वर्षात कोविड १९ महामारीमुळे ही शिबिरे घेतली गेली नाहीत. मात्र या वर्षी १० ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान डॉ राज लाला व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत नांदेड, रिसोड (OPD), औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी (OPD) आणि विसनगर (अहमदाबाद) या ठिकाणी शिबीरे होणार आहेत.
डॉ. शरदकुमार दिक्षित यांच्या निधनानंतर हे कार्य निरंतर सुरु ठेवण्यात त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉ राज लाला, डॉ. लॅरी वेड्रनस्टेन यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच या वर्षी ही शिबीरे होणार आहेत. डॉ लॅरी वेड्रनस्टेन व त्यांचे सहकारी पुणे, नागपूर, दिल्ली आणि जोधपूर या ठिकाणी डिसेंबर- जानेवारी या काळात घेणार आहेत. तसेच डॉ शरदकुमार दिक्षित यांची सुकन्या डॉ सुप्रिया दिक्षित व टीम यांच्या मार्फत इंदोर आणि उज्जैन या ठिकाणी डिसेंबर- जानेवारी या महिन्यात शिबीर घेतले जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे पुणे ग्रामीण विभागाचे पदाधिकारी व उद्योजक आनंद छाजेड यांनी दिली.
दरम्यान सप्टेंबरच्या दरम्यान डॉ राज लाला व त्यांचे सहकारी जिथे ही शस्त्रक्रिया करणार आहेत, त्यासंदर्भातील नावनोंदणीसाठी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही नोदणी वेळेत करण्याचे आवाहन भारतीय जैन संघटनेने केले आहे.
ठिकाण, दिनांक, रुग्णालयाचे नाव व नोंदणीसाठी संपर्क : नांदेड – १०-११ सप्टेंबर २०२२ – रयत रुग्णालय. रिसोड OPD – १२ सप्टेंबर २०२२ – श्री मन्नालाल अग्रवाल इन्स्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी, निजामपूर, रिसोड, वाशीम – 07745047119, 7218074259
औरंगाबाद – १३-१७ सप्टेंबर २०२२ – महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल. अहमदनगर – १९-२० सप्टेंबर २०२२ – जिल्हा रुग्णालय, अहमदनगर – 80070 74000. रत्नागिरी OPD – २२-२३ सप्टेंबर २०२२ – तुलसी नारायण हॉस्पिटल – 94232 91218
कोल्हापूर – २४-२५ सप्टेंबर २०२२ -डी.वाय. पाटील हॉस्पिटल – 98600 42323 , 92258 39501
विसनगर अहमदाबाद – २७-२९ सप्टेंबर २०२२ – सकलचंद विद्यापीठ, विसनगर 8160896852