मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील फाटाफुटीचे राजकारण अजूनही काही थांबायला तयार नाही. शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसमध्ये फूट पडण्याची चिन्हे असून माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे दोन आमदार शिंदे सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार असल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. चव्हाण व फडणवीस यांची भेट ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने झाली. मात्र राजकीय वर्तुळात भाजप समर्थक पत्रकारांनीच कॉंग्रेसमधील उभ्या फूटीचे चित्र समोर आणले आहे.
यामध्ये कॉंग्रेसचे दोन आमदार हे शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून जम्मू काश्मिरनंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता ही चर्चा सुरू झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळली आहे. आपण फक्त गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने गेलो असता देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. मात्र त्यानंतर देखील माध्यमे अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार अशीच चर्चा करत आहेत. त्यामुळे नक्की गौडबंगाल काय? याची उत्सुकता आहे.