विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात केवळ शिक्षण दिले जात नाही, तिथे परिपूर्ण माणूस घडावा या दृष्टीने सर्व कामकाज चालते.. तेथे स्वबळावर उभे राहण्यासाठी, समाजात उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठीही तेथे व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातात.. त्याचाच एक भाग असतो तो एकमेकांना मदत करण्याचा..! गेल्या काही वर्षांपासून असाच एक आदर्श उपक्रम येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन व डे स्कूल, शारदानगर येथे सुरू असतो..
काय असतो तो उपक्रम?…. तर या शाळेतील मुले गणेशोत्सव जवळ आला की, पर्यावरणपूरक गणपतीच्या मुर्ती बनवण्याचे काम करतात.. अगदी एक गणपती बनविण्याचा कारखानाच इथे सुरू असतो असे समजा..! तर हा गणपती प्रत्येक विद्यार्थी बनवतो.. एक म्हणजे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी …आणि त्या उत्पन्नातून आपले जे बांधव आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून सुरू असलेल्या कर्मवीर मेस योजनेत शिक्षण घेत असतात, त्यांच्या मोफत भोजनाच्या सोयीसाठी आपलाही हातभार लावत असतात.
ही दरवर्षाची अखंड परंपरा आहे. याही वर्षी माध्यमिक विभागातील आठवी ते दहावी च्या मुलांनी पर्यावरणपूरक गणपती बनवले आणि त्याची विक्री केली. त्यातून तब्बल १९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. ही रक्कम कर्मवीर मेसच्या व्यवस्थापकांकडे सूपूर्त करण्यात आली. निलेश लोणकर व रणधीर भोसले यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
काय आहे कर्मवीर मेस योजना?
शारदानगर शैक्षणिक संकुलात हजारो मुले,मुली शिक्षण घेतात. त्यातही काहीजणांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असते. या मुलींना शिक्षण घेणेही दुरापास्त होण्याची शक्यता असेल, तर तिथे त्यांची सोय कर्मवीर मेस मध्ये केली जाते. तेथे मुलींना मोफत भोजनाची, निवासाची व्यवस्था असते. संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून ही सामाजिक बांधिलकीची योजना सुरू झाली आणि आज ती अव्याहतपणे सुरू आहे.
विशेष म्हणजे या कर्मवीर मेसमधून आतापर्यंत हजारो मुली शिकल्या व करिअर घडवण्यात यशस्वी झाल्या आहेत. अशाच मुलींच्या कर्मवीर मेससाठी हे छोटे बहिणभाऊ मदत करीत असतात..