बारामती – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुका पोलिसांनी महाविद्यालयांच्या आवारात मोकाट फिरणाऱ्या टवाळखोर विद्यार्थी, रोडरोमिओंना आवर घालण्यास सुरवात केली आहे. काल बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने अशी २७ दुचाकीस्वार पकडून त्यांच्याकडील चौकशीनंतर त्यांच्याकडून तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला..
बारामतीच्या निर्भया पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या प्रतिष्ठान च्या महाविद्यालयाच्या परिसरात, सीसी कॉर्नर,अभिमन्यू कॉर्नर, संदीप कॉर्नर, विद्या प्रतिष्ठान मेन गेटसमोर तसेच पेन्सिल चौक परिसरात ही कारवाई केली.
यावेळी निर्भया पथकाने पेट्रोलिंग करून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या मुलांवर त्यामध्ये तीन जण एकाच दुचाकीवर फिरताना आढळले. काहींकडे परवानेच नव्हते. काहींनी जवळ परवाने बाळगले नव्हते. तसेच दुचाकीवर मोबाईल वापरणाऱ्यांवर पथकाने कारवाई केली.
२७ जण या कारवाईत पकडले गेले. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर बेशिस्त वर्तन करणाऱ्या आठ मुलांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.