सोलापूर महान्यूज लाईव्ह
घटना कशाही घडतात.. अलिकडच्या काळात तर नातीही शिल्लक उरली नाहीत अशी शंका यावी इतपत गुन्हेगारी घडताना दिसते. सोलापूर जिल्ह्यातील अशीच एक घटना समोर आली आहे. आईच्या श्राध्दासाठी झालेल्या खर्चापैकी केवळ ५०० रुपये दिले नाहीत, म्हणून मोठ्या भावाने लहान भावाचा चक्क जीवच घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील पिंजारवाडी येथे ही घटना घडली असून या घटनेत सैफन घुडूसाब नदाफ या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी मीरालाल घुडूसाब नदाफ व त्यांची मुले सलीम मीरालाल नदाफ, नियामतबी मीरालाल नदाफ, रफीक मीरालाल नदाफ यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफन व मीरालाल हे भाऊ असून त्याच्या आईचे वर्षापूर्वी निधन झाले. वर्ष झाल्यानंतर दोघा भावांनी एकत्रित खर्च करून अन्नदान केले. त्यासाठी गावातील मशीदीतून भांडी भाड्याने घेतली होती. या भांड्यांचे ५०० रुपये भाडे राहीले, म्हणून मशिदीच्या विश्वस्ताने सैफन याच्याकडे मागणी केली, तेव्हा सैफन यांनी मीरालाल यांच्याकडून घ्या असे सुचवले.
तेव्हा विश्वस्तांनी मीरालाल याच्याकडे मागणी केल्यानंतर मीरालाल यांनी पैसे दिले. मात्र त्याचा राग मीरालाल याला आला. दोन दिवसांपूर्वी सैफन शेतातील वीजेचा पंप सुरू करण्यासाठी शेतात गेल्यानंतर पाचशे रुपयांसाठी माझ्या घरी लोकांना पाठवले म्हणून दोघांत बाचाबाची झाली व मीरालाल याने सैफनला मारहाण केली.
ही मारहाण पाहून मीरालाल याचा मुलगा रफीक, सलीम व पत्नी नियामत या साऱ्यांनीच मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सैफन याचा उपचारादरम्यान सोलापूरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.