राजेंद्र झेंडे :महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात जून महिन्यात दौंड तालुक्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. तर जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली तर ऑगस्ट महिन्यात पावसाने हुलकावणी दिली आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पावसाने दमदार हजेरी लावत गणरायाचे एक प्रकारे जल अभिषेक घालून स्वागत केले.
गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पावसाचं आगमन झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात व थाटामाटात गणरायाचं मूर्तीची प्रतिस्थापना करत स्वागत केले.
दरम्यान, या पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांनी जलसमाधी घेतली आहे, तर अनेक ठिकाणी काढणीस आलेली बाजरी, कडवळ ही पिके जमीन दोस्त झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
दौंड तालुक्यात १ ते १२ जून पर्यंत २७१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या, या दिर्घ विश्रांतीनंतर बुधवारी ( दि.३१) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील अनेक भागात विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.पहाटे पर्यंत हा पाऊस सुरू होता.
यवतला ३१ मिलीमीटर, पाटस १७ मिलीमीटर, केडगाव ५ मिलीमीटर, देऊळगाव राजे ३९ मिमी, रावणगाव १९ मिलीमीटर, वरवंड ५ मिलीमीटर, दौंड ३ मिलीमीटर व राहु ४ मिलीमीटर अशा तालुक्यातील मंडल या प्रमाणे विविध भागात एकुण १२३ मिलीमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे.
ही माहिती दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विजय विप्पर यांनी दिली. दरम्यान, सर्वात जास्त पाऊस देऊळगाव राजे, यवत, पाटस व रावणगाव या परिसरात झाला आहे. तसेच केडगाव, वरवंड, राहू व दौंड शहर परिसरातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.