दिल्ली महान्यूज लाईव्ह
दिल्लीत आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने मत मांडताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर कडाडून टिका केली. पाच वर्षात भाजपने दुसऱ्या पक्षांचे २७७ आमदार खरेदी केले.. ६ हजार ३०० कोटी आमदारांना खरेदीसाठी खर्च झाले.. मित्रांनी देशाचे १० लाख कोटी खाल्ले.. आणि हे म्हणतात मी भ्रष्टाचाराविरोधात लढतोय…अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपला घेरले.
दिल्लीत ऑपरेशन लोटस भाजपकडून चालवले जात असल्याने हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस फेल झाले आहे हा संदेश देण्यासाठी हा ठराव मांडत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत आमदारांना २०-२० कोटींची ऑफर दिली गेल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला.
दरम्यान विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला केजरीवाल यांच्यासह ६२ पैकी ५७ आमदार उपस्थित होते. त्यामुळे केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावावेळी भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला, म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना मार्शल आऊट केले.
केजरीवाल यांनी या विश्वासदर्शक ठरावादरम्यान केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. मागील ७५ वर्षात कधीच कोणत्याच सरकारने दूध, दही, ताक, तांदूळ, गहू एवढेच काय मिठावर जेवढा कर लावला नाही, त्याच्या कित्येक पट या सरकारने लावला अशी टिका त्यांनी केली. देशात प्रत्येक गोष्टीवर कर आहे, मग ही रक्कम जाते कोठे? यांच्या मित्रांनी बॅंकांचे हजारो कोटी घेतले, परत केलेच नाहीत. एवढेच नाही, तर आपल्या मित्रांचे १० लाख कोटींचे कर्ज माफ करणारे सत्ताधीश आज जनता पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.