मुंबई महान्यूज लाईव्ह
आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय होणार याची माहिती भाजपच्या नेत्यांनी आधीच सांगितली आहे, आता असं होणार आहे, मग असे होणार आहे.. भाजपचे काही लोक हे विरोधकांच्या घरावर अशा धाडी होणार, तशा होणार असे सांगत असा एक गट राज्यात सध्या आहे, त्यांना लोक धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.
आज ठाण्यामध्ये पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या बेबंदशाहीवरून भाजपवर टिका केली. शिंदे गटाच्या आमदारांनी ५ वर्षे अशाच सुनावण्या सुरू राहतील असे केलेले विधान हेच काहीतरी जुळल्याचा संशय आणणारे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात पाच वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. पुढील एक दोन सुनावण्यांमध्ये याचा निर्णय कोर्ट देऊ शकते असे मत पवार यांनी व्यक्त केले.
संजय राऊत भाजप व केंद्र सरकारविरोधात बोलत होते, नवाब मलिक बोलत होते. त्यांचे आरोप सहन होईनात म्हणून त्यांना तुरुंगात टाकले गेले. झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांचे लोक फोडून सरकार स्थापन करण्यात आले. आतादेखील कोणाचे खच्चीकरण करता येईल, ईडी पाठीमागे लावता येईल किंवा सीबीआय लावता येईल असे प्रयोग सध्या सुरू आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अमिषे दाखवून सत्ता धेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, मात्र अशा पध्दतीने सत्ता घेतली जात असल्याने हा संसदिय लोकशाहीवरचा हल्ला आहे.