दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्य घेण्याच्या योजनेमधून स्वतःहून बाहेर पडावे असे आवाहन दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.
सर्व शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजने अंतर्गत सवलतीच्या दरात अन्नधान्य वाटप केले जाते. मात्र ही योजना गरजु व आवश्यक शिधापत्रिका धारकांसाठी राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ज्या गरजू व आवश्यक असलेल्या लाभार्थ्यांच्या इष्टकांच्या मर्यादेमुळे अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
यामुळे ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आणि अन्नसुरक्षा ( २०१३ ) कायद्याअंतर्गत पात्र असलेला लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घ्यायचा नसल्यास व देशात बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हायचा असल्यास अशा लाभार्थ्यांनी ( सरकारी नोकरदार, बागातदा शेतकरी, खाजगी क्षेत्रातील मोठे पगारदार, खाजगी नोकरी, पेन्शनधारक, व्यवसाय उत्पन्नाच्या स्वतःद्वारे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागाकरिता ४४ हजार व शहरी भागाकरता ५९ हजार पेक्षा जास्त तसेच चार चाकी वाहन आहे, लाभार्थीपैकी ज्या कुटुंबातील व्यक्ती प्रदेशात आहे असे लाभार्थी तसेच धान्य सोडणार असतील अशा लाभार्थ्यांनी) विविध नमुन्यातील अर्ज भरून रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावेत. असे आवाहन तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.
जर आर्थिक सक्षम असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी अन्नसुरक्षा योजनेतून स्वतःहून बाहेर पडण्यासाठी व धान्यसुरक्षा योजनेचा लाभ सोडण्यासाठी स्वत:हून पुढे आले नाही, तर तहसीलदार कार्यालामार्फत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.