शिरूर : महान्यूज लाईव्ह
शेतकऱ्याने ठरवले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय नुकताच मांडवगण फराटा येथे आले असून साडे नऊ रुपयांची मालाची पट्टी देऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला अखेर व्यापाऱ्याने अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले. त्यांनी उत्पादित केलेला फ्लॉवर विक्रीसाठी नवी मुंबई येथील बाजार समितीत सूर्यकांत शेवाळे यांच्याकडे पाठवला होता.
फराटे यांनी पाठवलेल्या फ्लॉवर च्या १७ गोण्यांना सर्व खर्च वजा करून अवघे साडेनऊ रुपये पट्टी व्यापाऱ्याकडून देण्यात आली होती. मात्र फराटे यांना विक्रीबाबत शंका आल्याने त्यांनी ठाम राहत साडे नऊ रुपयांचा धनादेश व्यापाऱ्याला पाठवला व इतर शेतकऱ्यांना याची माहिती दिली. ही बातमी हळूहळू परिसरात व तेथून भाजीपाला उत्पादकांपर्यंत वेगाने पोचली.
याबाबत महान्यूज लाईव्ह ने देखील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून शेतकऱ्याची बाजू मांडली होती. शेतकरी बोलू लागले. त्याची धग मुंबईपर्यंत पोचली. अखेर नवी मुंबई येथील व्यापाऱ्याने मांडवगण फराटा येथे संबंधित शेतकऱ्याची भेट घेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत अकरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
या प्रसंगी संबंधित शेतकऱ्याने मिळालेला धनादेश ग्रामदैवत श्री वाघेश्वर चरणी अर्पण केला. शेतकरी हा राजा समजला जातो. शिरूर तालुक्यातील पुर्व भागातील अनेक शेतकरी मोठ्या तरकारी पिके घेत असतात.
शेतकरी हे प्रसंगी कर्ज काढून काहीतरी मिळेल या आशेने मालाचे उत्पादन घेत असतात. उत्पादित केलेला माल हा पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी विक्री साठी पाठवतात. मात्र अनेकदा माल हा कवडीमोल भावाने विकला जातो. तर काहीवेळा अचानक दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते. अगदी एक रुपयाही त्यातून निघत नाही. यावर यापुढील काळात आवाज उठविणार असल्याचे शेतकरी किसन फराटे यांनी सांगितले आहे.