सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर – २६ ऑगस्टच्या पहाटे अडीच वाजता इंदापूरजवळ वरकुटे पाटी गावच्या हद्दीत गुजरातच्या व्यापाऱ्याला कार थांबवत नाही, म्हणून गोळीबार करून लुटमार केली व साडेतीन कोटी रुपये लुटून नेले. ही घटना इंदापूर तालुक्यालाच नाही, तर संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. याच्या तपासात पुढे काही निष्पन्न होईलच, मात्र रात्रीच्या वेळी हा व्यापारी चक्क साडेतीन कोटी रुपये रोख घेऊन कसा काय निघाला होता? नोटाबंदी या व्यापाऱ्यांना लागू नाही का? या प्रश्नाचेही उत्तर मिळणे गरजेचे आहे.
गुजरातमधील कहोडा, जि. मेहसाना येथील भावेशकुमार अमृत पटेल हे ४० वर्षीय नोकरदार मुंबईतील पंचरत्न बिल्डींगमध्ये राहतात. ते २६ ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान पुणे- सोलापूर रस्त्याने प्रवास करीत असताना त्यांची स्कॉर्पिओ जीप (टी. एस. ०९/ ई.एम. ५४१७) समोर अज्ञात चार चोरटे आडवे आले. त्यांनी लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडवली. मात्र पटेल यांनी गाडी जोरात नेली. मग या चोरट्यांनी मारूती सुझुकी कंपनीची स्विप्ट कार व टाटा कंपनीच्या जीपमधून पटेल यांच्या गाडीचा पाठलाग केला व गाडी थांबवत नाही, म्हणून गाडीवर गोळीबार केला.
मग कार थांबवली. भावेशकुमार व विजयभाई नावाच्या जोडीदाराला मारहाण केली. मग गाडीतील ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड व दोन मोबाईल फोन असा एकुण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये लुटले.
या घटनेने पुणे हादरले.. महाराष्ट्र हादरला.. वगैरे वगैरे..! आता ही घटना घडल्यानंतर असा प्रश्न सामान्यांच्या मनात पडलाय की, नोटाबंदीनंतर सामान्यांना दोन लाख रुपयेदेखील रोख वापरता येत नाहीत, स्वतःजवळ ठेवता येत नाहीत, या व्यापाऱ्यांनी साडेतीन कोटी कसे ठेवले? साडेतीन कोटी ठेवले, तेही ठिक.. एखादा मोठा व्यवसाय असेल, तर दिवसाकाठची व्यवसायाची रक्कम असू शकते.. मग रात्रीच्या वेळी एवढी रक्कम घेऊन जाण्याचे प्रयोजन काय? नोटाबंदीचे नियम गुजरातमधील व्यापाऱ्यांना लागू नाहीत का? असे प्रश्न सामान्यांना पडले आहेत, ज्याची काल दिवसभर इंदापूर तालुक्यात चर्चा सुरू होती.