शीतल अहिवळे
फलटण : महान्यूज लाईव्ह
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना किशोरवयीन मुलींच्या समस्या आणि त्याचबरोबर सुदृढ समाज निर्मितीसाठी, सुदृढ मातृत्वासाठी नवचेतना शिबिराचे आयोजन मुधोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले. यामध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग मधील शिक्षिका डॉ. सौ. नीलिमा दाते आणि डॉ. सौ. अलका पोळ यांनी विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रा.डॉ. पी.एच. कदम तसेच ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.श्री. वेदपाठक यांनी डॉ. नीलिमा पोळ आणि डॉ. अलका पोळ यांचा यथोचित सन्मान केला, त्याच वेळी पत्रकार शितल अहिवळे हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीची शपथ दिली आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा दाते यांनी विद्यार्थिनींना समर्थ, सक्षम, कणखर, खंबीर आणि सहनशील होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा, कोणत्या कोणत्या मार्गाने मिळवता येते याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. यानंतर अलका पोळ यांनी ऊर्जेचे स्त्रोत सांगताना झोप, आहार, विहार, श्वास याबद्दल माहिती दिली. आणि त्यानंतर ध्यानधारणा कशी करावी या याबद्दल मार्गदर्शन केले. भस्रिका प्राणायाम, ओमकार उच्चार याबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थिनींकडून प्रात्यक्षिकही करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. उर्मिला भोसलेयांनी केले. तर सूत्रसंचालन सौ नीलम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शिंदे आणि इतर सर्व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी सहकार्य केले.