सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यामध्ये अनेक रुग्णालयातील रुग्णांना रक्ताची मोठी गरज असताना रक्तपेढीची रक्त साठा कमी पडत आहे. मानवी जीवन वाचवण्यासाठी रक्ताची गरज लक्षात घेऊन इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त बाभुळगाव मध्ये जगताप क्लिनिक येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.त्याचा प्रारंभ बुधवारी (दिनांक २४ ) रक्तदान शिबिराने करण्यात आला.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन ७६ वेळा रक्तदान केलेले रक्तमहादाता दत्ता जाधव रांझणीकर , पोपट भोसले, विठ्ठल मोरे, मधुकर खिलारे, बंडु जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष म्हणजे गावातीलच तरुण वर्गाने रक्तदान करुन शिबिर यशस्वी केले. रक्ता वाचून जीव गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांसाठी छोटीशी केलेली मदत म्हणजे आजचे रक्तदान शिबीर आहे , असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. इंदापूर येथील ‘मुक्ताई ब्लड सेंटर’ व अविनाश नामदेव ननवरे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष-अल्ताप शेख ,उपाध्यक्ष – सागर लोंढे, खजिनदार – महेश मोरे व जयंती महोत्सव कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.