सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्यातील सत्तांतरावरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मोठे रणकंदन चालू होते. दोन्ही बाजूकडील आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जात असताना आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यात विकासासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
यंदाचे पावसाळी अधिवेशन हा राजकीय आखाडा बनला,अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये इतका गोंधळ झालेला पहावयास मिळाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद दिसून आला. अशी गोंधळाची परिस्थिती असताना इंदापूरचे लोकप्रतिनिधी, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुक्यासाठी मात्र नेहमीप्रमाणे विकास निधीसाठी प्रयत्न चालू होता.
आमदार भरणे हे एक सभ्य व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणावर ज्यादा भर असतो. आपापल्या मतदारसंघांमध्ये विकास निधी खेचून आणण्यासाठी दत्तात्रय भरणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, कारण कोणत्याही वादविवादामध्ये न पडता ते विकासाभिमुख राजकारणासाठी प्रामुख्याने प्रयत्न करत असतात.
भरणे यांनी आताही अधिवेशनाच्या काळात इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची गळ प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन घातली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निधीची मागणी केली. यामध्ये तालुक्यातील पूर्ण कामे व नवीन मंजूर करायचे कामे यासंदर्भात चव्हाण यांच्याशी चर्चा केली व चव्हाण यांनी त्यांना आश्वासन आश्वासन दिले.