बारामतीत मारहाण करणारा सावकार व त्यांचे पंटर वर गुन्हा दाखल.
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील गणेश मार्केट मध्ये सावकारीच्या पैशातून निरावागजच्या सावकाराने मुलासह काही साथीदारांना आणून बेदम मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी सावकार व त्याच्या साथीदारांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या संदर्भात बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामतीतील अभिजीत पुष्कराज टाटिया (वय 36 वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी, बारामती) हे गणेश मार्केटमध्ये किराणा दुकान चालवतात. 2018 मध्ये त्यांना व्यवसायासाठी पैशाची आवश्यकता होती, म्हणून निरावागज येथील विजय देवकाते याने टाटिया यांची निरावागज गावातीलच अवैध सावकार कुंडलिक काळे याच्याशी ओळख करून दिली.
कुंडलिक काळे याच्याकडून टाटिया यांनी 5 टक्के व्याजदराने 40 हजार रुपये घेतले. तारण म्हणून बारामती अर्बन बँकेचा धनादेश टाटीया यांनी काळे याला दिला. त्यानंतर प्रत्येक महिन्याला या पैशाचे व्याज त्यांनी दिले. याव्यतिरिक्त कुंडलिक काळे हा त्याला वाटेल तेव्हा टाटिया यांच्या व्हाट्सअप वर किराणा मालाची यादी पाठवत होता. त्यानुसार टाटीया त्याला किराणा माल देत होते.
गेल्या चार वर्षाच्या काळात आत्तापर्यंत 40 हजाराच्या बदल्यात त्यांना 39 हजाराचा किराणा व 1.27लाख रुपये रोख दिले, तरीसुद्धा त्याची व्याजाची मागणी थांबली नाही. काल सायंकाळी कुंडलिक काळे हा टाटिया यांच्या दुकानात आला व दोन महिन्याचे राहिलेले व्याज दहा हजार रुपये मागितले.
त्यावेळेस टाटिया यांनी काळे याला सांगितले की, आता मुद्दल व व्याज फिटले आहे. तेव्हा कुंडलिक काळे याने त्याचा मुलगा अक्षय काळे याला बोलावून घेतले आणि हे लोक व्याज देत नाही असे सांगितले. त्यानंतर अक्षय काळे हा त्याच्या आणखी तीन पंटर लोकांना सोबत घेऊन दोन मोटरसायकलवर टाटीया यांच्या किराणा मालाच्या दुकानात आला.
या सर्वांनी अभिजीत टाटिया व त्यांचे वडील पुष्कराज टाटिया यांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर दुकानांमध्ये मारहाण केली व पैशाची मागणी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. त्यानंतर टाटिया यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण व सावकारी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशानुसार कल्याण खांडेकर हे करत आहेत.