विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह
प्रियांका म्हणले तर तुम्हाला आठवेल प्रियांका चोप्रा जी आज विदेशामध्येही अभिनयाचे क्षेत्र गाजवून भारताचे नाव उज्जल करते आहे. थोडी राजकीय समज असलेल्यांना आठवतील कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, त्यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत ‘ लडकी पढेगी, लडकी लढेगी’ चा नारा लावून धरला होता. पण आमच्या बारामती तालुक्यात अशी एक प्रियांका होती, जी शाळेचे वय होऊन शाळेत जाऊ शकत नव्हती. तिच्याकडे ना जन्माचा दाखला होता, ना वडिलांकडे आधारकार्ड होते. पण निरावागजच्या काही जागृत नागरिकांनी मनावर घेतले आणि आता ही प्रियांका शाळेत जाऊ लागली आहे.
माणुसकीचा गहिवर दाखविणारी प्रियांकाची ही कहाणी बारामती तालुक्यातील निरावागजची. गावोगाव हिंडून, तिथे पाल ठोकून लोहारकाम करणारे तिचे वडील साहेबराव पवार आणि आई हिराबाई. त्यांच्यासोबत लहानगी प्रियांका नीरावागजला आली. पण ऐके दिवशी तिचे वडील लोहारकाम करत असताना त्यांच्या अंगावरच वीज कोसळली आणि त्यांचे अर्धे शरीर भाजून निघाले.
गावकऱ्यांनी लोकवर्गणी केली आणि त्यांच्यावर उपचार केले. या उपचारामुळे साहेबराव ठणठणीत बरे झाले. त्यानंतर आला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन. गावात सगळ्यांच्या घरावर तिरंगा लावलेला पाहून या छोट्या प्रियांकानेही काही गावकऱ्यांना आपल्या पालावरही तिरंगा लावण्याची विनंती केली.
तिचे घर म्हणजे ताडपत्रीच बांबू काठ्यांनी उभा केलेलं पाल. यावरती गावकऱ्यांनी तिच्या इच्छेला मान देत तिथे तिरंगा फडकवला. ऐवढेच नव्हे तर या कुटु्ंबाला अन्नधान्य, संसार उपयोगी वस्तूबरोबर नवीन कपडेही घेतले.
पण या सगळ्यामध्ये या छोट्याशा प्रियांकाने गावकऱ्यांपुढे शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिची ही इच्छा ऐकून सुनील देवकाते, संजय सागडे, दीपक परदेशी, झंजे गुरुजी यांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे मनावर घेतले. आणि मग अगदी वाजत गाजत प्रियांकाचे शाळेमध्ये स्वागत केले गेले. . तिला पहिल्या दिवशी शाळेचा युनिफॉर्म तसेच नवीन शूज, स्कूल बॅग दिली गेली. या सगळ्यांसह शाळेत पोचलेल्या प्रियांकाच्या आनंदमयी स्वागत सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबर गावकरीही सहभागी झाले.
प्रियांकाचे अंदाजे वय आठ वर्षाचे. तिच्या आई-वडिलांकडे ना आधार कार्ड, ना रेशनिंगकार्ड, ना मतदान कार्ड. प्रियांकाचा जन्म दाखला उपलब्ध नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तिच्या जन्मतारखेचा प्रश्न पडला आहे. मात्र गावकऱ्यांनी हार मानलेली नाही. साहेबराव यांच्या मूळ गावी त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पण दुसरीकडे प्रियांका दररोज शाळेत येत आहे. पहिल्याच दिवशी तिने मुलांबरोबर अभ्यासात प्रगती केली. पिढ्यान पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या कुटुंबातील एक मुलगी आता शाळेची वाट चालते आहे. ही छोटीशी प्रियांकाही शिक्षणाच्या जोरावर त्या प्रियांकांच्या तोडीस तोड कामगिरी करेल. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाटेवर चालेल अशी स्वप्न आता गावकरी आणि शाळेतील शिक्षक रंगवत आहेत.