यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वाहन चालकांना केले हे आवाहन!
दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. त्यात फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली वाहन जप्ती करीत असल्याचे सांगत वाहन चोरी होण्याच्या प्रकारातही आता वाढ होत आहे.
वाढत्या वाहन चोरीला आळा बसावा यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वाहन चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील काही महिन्यांपासून यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रोज एक गुन्हा वाहन चोरीचा दाखल होत आहे.
या वाहन चोरी मुळे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहन चालकांनी आपल्या वाहनांना लॉक बसवून घ्यावे तसेच ते सुरक्षित ठिकाणी लावून काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र पोलीसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी वाहन चोरीच्या प्रकारात वाढतच आहेत.
आता त्यात एक भर पडली आहे, ती म्हणजे, आम्ही फायनान्स कंपनीकडून आलो आहोत. तुमच्या गाडीचे हप्ते थकीत असल्याचे सांगत वाहन जप्त करून चोरीचे प्रकार ही घडत असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना फायनान्स कंपन्यांने वाले असल्याचे सांगून जर कोणी कर्ज हप्ते थकीत आहेत, या नावाखाली वाहन थांबवून परस्पर जप्तीची कारवाई च्या नावाखाली घेऊन जात असेल तर वाहन चालकांनी तत्काळ यवत पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
तसेच फायनान्स कंपनीचे कर्मचारी किंवा एजंट असेल आणि ते जर वाहन ताब्यात घेत असले तरी त्यांनी कायदेशीर प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या ताब्यात आपली वाहने देऊ नयेत. ह्या फायनान्स कंपन्यांना पोलीस संरक्षणात वाहन जप्त करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्याबरोबर नसताना जर कोणी वाहन हप्ते थकबाकीच्या नावाखाली वाहन कोणी ओढून घेऊन जात असेल तर आपली वाहन कोणीही संबंधित फायनान्स कंपनी च्या कर्मचारी किंवा एजंटच्या ताब्यात देऊ नये.
वाहन चालकांनी अशा वेळी तत्काळ पोलीस स्टेशनला (११२) किंवा संबंधित पोलीस स्टेशनच्या फोनवर संपर्क साधावा, वाहन चालकांनी आपली वाहने परस्पर कोणत्याही फायनान्स वाल्यांच्या ताब्यात देऊ नये. असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी प्रसिद्ध पत्रिकेद्वारे वाहन चालकांना केले आहे.
दरम्यान, मनमानी पद्धतीने व कायद्याची पायमल्ली करत नियम धाब्यावर बसून फायनान्स कंपनीचे कर्मचारी किंवा एजंट हे वाहने रस्त्यात अडवून दमदाटी करून सक्तीने वाहने ताब्यात घेण्याचे प्रकारही घडत आहेत. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या या आवाहनामुळे फायनान्स कंपन्यांना लगाम बसला आहे तर वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.