नानाची टांग..
( गावाच्या बाहेरचे हॉटेल.. संध्याकाळची प्रसन्न वाटणारी सकाळ!… एक शहरातील डॉक्टर, गावातला डॉक्टर मित्र व गावचा सरपंच तिघांचीच मैफल जुळलेली.. महागड्या व दर्जेदार मद्याची टेबलावर रेलचेल.. जोडीला दर्जेदार चकणा.. आणि अत्यंत प्रसन्न मुद्रेने सुरू असलेली चर्चा… )
डॉक्टर-१ – राव्या कसं चाललंय रे तुझं दुकान?… आता तर काय रस्ताही मोठा झालाय, दररोज अॅक्सिडेंट होत असतील… ओपीडी पण जोरात असेल ना..?
डॉक्टर -२ – रस्ता मोठा झाला राव.. पण घात झालाय… एवढी मोठी ओटी काढलीय.. मी काढली की, लगेच कुम्याने पण ओटी सुरू केली ना राव.. आता तो फ्रंटलाच आलाय.. रस्त्याने फक्त एका बाजूने जाणारीच गिऱ्हाईक माझ्या ओपीडीत… आणि दुसऱ्या बाजूची त्याच्या दवाखान्यात… मोठा प्रॉब्लेम झाला.. एवढा खर्च केलाय राव.. कर्ज काढलीयत..
डॉक्टर-१ – हात्तीच्या एवढंच ना.. डोन्ट वरी.. तुम्ही दोघं का नाही एकदा बसत.?.. ठरवून घ्या ना.. फिफ्टी- फिफ्टी.. काय म्हणता सरपंच?
सरपंच – ह्यॅ मग काय तर! अवं भावाभावासारखं वागा की… भावकीसारखं कशापाई वागताय.. डॉक्टरसाहेब आम्ही या दोघास्नी लय मदत केली… आता आम्ही समाजकार्यातच आहोत की, कोणाला काय दुखलं.. खुपलं.. आम्हाला विचारलं की थेट यांच्या दवाखान्यात पाठवतो आम्ही.,, काय डॉक्टर सांगा की, खरं की नाय हे..
डॉक्टर -२ – हो खरंय ओ… पण माझी पंचाईत वेगळीच आहे… कोरोना गेला.. कोरोनाच्या जीवावर बरीच दुकानदारी करून ठेवलीय.. चौथ्या लाटेनं बी मातीत घातलं.. सगळं स्ट्रक्चर बदललं.. पण घोळ झालाय…
डॉक्टर -१ – कसला घोळ रे.. तुम्ही गावठी सारे सदा न कदा रडत बसता.. नो चिंता..नो वरी… मला सांग तुमच्या गावात काय परिस्थिती आहे?
डॉक्टर २- कसली परिस्थिती?
डॉक्टर १ – आय मीन आता तुझ्याकडं कोणते पेशंट येतात? फिव्हर, कफ..
डॉक्टर २ – हा आहे, जरा बरी.. २०-२५ ची ओपीडी होतेय.. पण काय व्हायरल आहे ते जरा.. एका दिवसात बरे होताहेत.. काय मजा उरली नाय राव.. या धंद्यात..
डॉक्टर १ – तीच तरा जरा मजा आहे.. चाखून बघ गड्या.. तुझ्याकडं फिव्हरचे येतात ना पेशंट.. मग काय करतोय तू..
डॉक्टर २ – गावाकडं सगळी ओळखीची, फॅमिली मानणारी असतात ना.. फार तपासण्या करता येत नाहीत.. उगीच कसं तरी होतं रे..
डॉक्टर १ – काय उगीच होत नाही.. आपण उलट पेशंटची काळजी घेणारी माणसं आहोत.. सगळे रुटीन चेकअप करून घ्यायचंच.. पण डेंग्यू टेस्ट करायचा.. लॅबचा जांगुडगुत्ता सुरूय ना..
डॉक्टर २ – लॅबचा आहे.. पण उगीचच कशाला लगेच टेस्ट करायला लावायची.. साधा व्हायरल असतो.. दोन दिवसांत उरकतो..
डॉक्टर १ – हेच तर चुकतं.. तुमच्या गावठीचं.. सरपंच.. यांच्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे एक.. जरा आमची रिक्वेस्ट समजून घेतली तर दोघांचबी कल्याण होऊ शकतं..
सरपंच – ते कसं.. सांगा बरं.. जरा विसकटून सांगा, म्हंजी आम्हाला कळंल..
डॉक्टर १ – हे बघा.. सध्या पाऊस पडून गेलाय.. बऱ्यापैकी पाण्याची डबकी झालीयत… कचरा, कुंड्या नसल्यामुळं जरा अस्वच्छताही असेलच..
सरपंच – बरं.. त्याचं काय…. लगोलग फवारण्या करून घेऊ की..
डॉक्टर १ – त्याचंच आहे बघा जरा.. आणि हो फवारणी लगोलग करायचीच नाही.. आता याच्याकडं जे पेशंट येत्याल ना.. ते फस्ट डे टेस्ट होतील.. डेंगी निघेल.. चिकुनगुनिया नाहीच तर मग व्हायरल फिव्हर.. पण तुमच्याकडं लोकांचे फोन येतील… डास वाढलेत…बिडलेत सांगायला… फक्त पंधरा दिवस कळ काढायची.. .मशीनच बिघडलीय…माणूसच नाही.. उद्याच व्यवस्था करतो.. इकडच्या भागात उद्यापासून फवारणी सुरू करतो.. तिकडच्या भागात सुरू करतो असे सांगून जरा वेळ मारून न्या.. बाकी बघायला आम्ही समर्थ आहोत..
सरपंच – त्यानं काय होईल…?
डॉक्टर १ – त्यानं काय होईल..? ते येत्या काही दिवसांतच समजेल.. फक्त आजची संध्याकाळ याच्या आयुष्यात पुन्हा नवी प्रसन्न पहाट घेऊन येईल… (दोघेही डॉक्टर एकमेकांकडे बघून हसतात)
तिसऱ्या दिवशी सरपंचांना एक फोन येतो..
भाऊराव – हॅलो सरपंच.. सरपंच.. अहो, समजलं का? आपल्या गावात डेंग्यू लय वाढलाय.. माणसंच्या माणसं आजारी पडल्यात.. सगळीकडं डेंगूच डेंगू.. पलिकडच्या वाड्यातला जगन तर आयसीयूत आहे.. पेशी कमी झाल्यात म्हणं.. लय वंगाळ राव… आतापर्यंत दोन लाख गेल्यात.. फवारण्या करा म्हणतेत सगळे गावठाणातले पण… आणि वाड्यावस्त्यांवरचे पण…!
सरपंच – हॅलो.. भाऊराव… हो का.. बरं बरं.. चिंता नको.. आपण लगेच फवारणी करून घेऊ… पण काय आहे .. मशीनच सध्या बिघडलीय.. दुरूस्त करायला टाकलीय.. येईल ती उद्या किंवा परवा.. मी आजच ग्रामसेवकाला तशी सूचना देऊन टाकतो..! बाकी पेशंट गावात असत्याल तर लगोलग त्यांच्या घरी जा.. विचारपूस करा.. मी पण उरकून आलोच… आपण रावसाहेबाच्या दवाखान्यात त्यांस्नी अडमिट करून टाकू.. चिंता नको..!