बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवारांची चाचपणी करीत आहे, यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारांबरोबरच स्थानिक मातब्बर उमेदवारांचा व ज्यांच्यावर टिका केली जाणार नाही, अशा उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. आता या यादीत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याही नावाची भर पडली आहे. नुकतीच यासंदर्भात जाचक यांचीदेखील भाजपच्या नेत्यांसमवेत भेट झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
ए फॉर अमेठी व बी फॉर बारामती असे सूत्र सांगत भाजपने महाराष्ट्रात राजकीय दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे. भाजपने देशभरातील विरोधकांचे पारंपारिक गड काबिज करण्यासाठी कधीही जिंकू न शकलेल्या १५० लोकसभा मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रीत करायचे ठरवले आहे. त्याअंतर्गत भाजपच्या निवडणूक रणनितीचे शिल्पकार गृहमंत्री अमित शहा यांनी मिशन १५० मोहिमेला सुरवात केली आहे. यामध्ये केंद्रातील प्रत्येक मंत्र्याला चार मतदारसंघांचे क्लस्टर दिले असून त्यांना या ठिकाणचे दत्तक पालकमंत्री केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा अभेद्य मतदारसंघ आहे. या मतदारसंघासाठी अशीच तगडी व्यक्ती नेमण्यासाठी भाजपने फार विचारविमर्श केला व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची नियुक्ती केली.
सितारामण या मोहिमेअंतर्गत १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्काम करणार होत्या, तसेच आठ तालुक्यांना भेटी देऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होत्या. त्यांच्या या दौऱ्याचे संपूर्ण कार्यक्रमही तयार करण्यात आले होते. तसेच त्या या दौऱ्यात कोठे भेटणार, नेमक्या कोणाच्या घरी जाणार, कोणत्या गावात जाणार याचे राजकीय दृष्टीने फायद्याचे ठरेल असे बारकाईने निरीक्षण करून तसा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र सितारामण यांचा पहिलाच दौरा रद्द झाला. आता त्या सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीलाच यावेळी उमेदवारी द्यावी असा आग्रह असल्याने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे आमदार राहूल कुल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जालिंदर कामठे यांच्यासह भाजपच्या इतरही पदाधिकाऱ्यांच्या नावाची चाचपणी सुरू असतानाच आता आणखी एक ट्विस्ट यामध्ये आला आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचेही नाव चर्चेत आले आहे. पृथ्वीराज जाचक यांचे काही काळापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी मनोमिलन झाले होते. मात्र छत्रपती कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना संचालक मंडळाशी मतभेद झाल्यानंतर व संचालकांच्या बैठकीत सहभाग घेण्यापासून त्यांना बाजूला केल्यानंतर ते पुन्हा पूर्वीच्या भूमिकेत आले आहेत.
नुकतीच काही दिवसांपूर्वी त्यांची भाजपच्या प्रदेशातील शिर्षस्थ नेत्यांशी भेटीगाठी झाल्या असून या भेटीत लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात उतरण्यासाठीही चाचपणी झाली आहे. विशेष म्हणजे जाचक यांच्यावर टिका करण्यासारखे काहीच नसल्याने, हा भाग शेतीप्रधान असल्याने अभ्यासू व सक्षम विरोधी उमेदवार म्हणून जाचक यांच्याही नावाची चाचपणी भाजपकडून झाली आहे. या भेटीत जाचक यांनीही या उमेदवारीस तयारी दर्शवल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भाजपकडून बारामतीसाठी कोण हा प्रश्न पुन्हा नव्याने उभा राहीलेलाच आहे.