मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र विधानसभेच्या बाहेर पायऱ्यांवर आज जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर उभे राहून मुंबई महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर त्याठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आल्यानंतर त्यांनी प्रतिघोषणा देऊन प्रत्तूत्तर दिले. यावेळी आमदार महेश शिंदे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्कीही झाली. आमदार महेश शिंदे यांनी यावेळी शिवीगाळही केल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी नंतर सांगितले. यावेळी आमदारांच्यात हाणामारी झाल्याचे अभूतपूर्व दृश्य पहायला मिळाले.
यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे आमदार अमोल मिटकरींच्या अंगावर धावून जात असल्याचेही उपलब्ध व्हिडिओमध्ये दिसत आहे. यातच शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी, ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. आम्ही कोणाला पाय लावत नाही, पाय लागला तर हात जोडतो. पण कुणी पाय लावला तर त्याला सोडत नाही, असे भरत गोगावले म्हणाले.