सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर पंचक्रोशी मध्ये सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा म्हणून नावलौकिक मिळविणा-या माधुरी सुभाष मंदरे यांचा औरंगाबाद मधील खुलताबाद वैद्यकीय समितीच्या वतीने आदर्श व्यक्तीमत्व हा राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ देवून सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण सोहळा खुलताबाद येथे पार पडला. या कार्यक्रमामध्ये नेता किंवा अभिनेता यांचे हस्ते पुरस्कार वितरण न करता आदर्श परिचारिका पुरस्कार राष्ट्रपतींचे हस्ते ज्यांना मिळाला आहे, त्या आदर्श महिला आशाताई गजरे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
माधुरी मंदरे या ज्या मुलांना आई वडिल वडिल हयात नाहीत अशा मुलांचा पहिली ते १२वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च करत आहेत. ही मुले महाराष्ट्रातून सर्व ठिकाणची आहेत. महिला विकास व सबलीकरण साधणेसाठी प्रशिक्षण व स्वयंरोजगार मिळवून देणे व स्वतःचे पायावर उभारुन उदरनिर्वाह करणेसाठी महिलांना सक्षम करणेचे कार्य २००१ पासून आजतागायत अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श समाज सेवक म्हणून पुणे राज्य पुरस्कार,सत्वशिलाताई पृथ्विराज चव्हाण यांचे हस्ते हिरकणी हा राज्य पुरस्कार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते राजीव गांधी पुरस्कार , यासह अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.
सध्या माधुरी मंदरे या ३ संस्थांच्या व एका वाचनालयाच्या अध्यक्षा आहेत. तसेच इंद्रेश्वर जेष्ठ नागरीक संघाच्या उपाध्यक्ष आहेत. सहिष्णुता व नेहमी मदतीचा हात पुढे हा त्यांचा स्वभाव आहे. तसेच अनेक कलेत त्या पारंगत असून उत्कृष्ट कवीही आहेत. अनेक मासिकातून व वृत्तपत्रांमधून त्यांच्या कविता प्रसिध्द झाल्या आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए आय एस एफ समितीचे राज्याध्यक्ष डॉ.अमोल जाधव यांनी केले.