बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील 52 वर्षीय महिला रुग्णाचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाला असून ही घटना चार ऑगस्ट रोजी घडली आहे. याची माहिती आज बारामतीत समजल्यानंतर खळबळ उडाली. मात्र ही घटना अगोदरच घडली असून सध्या बारामतीत स्वाईन फ्ल्यूचा कोणीही संशयित रुग्ण नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. अर्थात गेले वीस दिवस ही माहिती उघड झाली नसल्याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बारामती शहरातील या 52 वर्षीय महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने तिच्यावर बारामतीमध्ये काही दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने पुण्यातील के.ईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रकृती वारंवार बिघडत गेल्याने के ई एम हॉस्पिटल मध्ये स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. ही घटना चार ऑगस्ट रोजी झाली असून, 23 जुलैच्या दरम्यान महाबळेश्वर भागात गेल्यानंतर त्यांना त्याची लागण झाली असावी अशी माहिती बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.
दरम्यान बारामतीमध्ये या घटनेनंतर आरोग्य खात्याने सर्वेक्षण केले असून विविध प्रकारची तपासणी करण्यात आली. मात्र कोठेही स्वाइन फ्लूचा एकही संशयित रुग्ण आढळला नसून गेल्या पंधरा दिवसात देखील कोणीही आढळला नसल्याची माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.