घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
‘ आपल ठेवायच झाकून आणि दुसऱ्याचे बघायच वाकून ‘ हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव असतो. याच स्वभावानूसार सध्या धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा- मुंडे यांच्यातील संबधांपासून संघर्षापर्यंतच्या चर्चा मोठ्या चवीने चघळल्या जात आहेत. एक जर राजकारण हा आपला, त्यातून काहीही फायदा नसला तरीदेखील मोठा आवडीचा विषय. त्यात अनैतिक संबंधाची फोडणी असल्यानंतर मग आणखी काय पाहिजे. त्यामुळेच करुणा शर्मा – मुंडे सध्या सोशल मिडियावरील एक हॉट कॅरॅक्टर ठरलेल्या आहेत.
‘ तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया आणि ‘ करुणा ‘ दाखवली, पण परत परत ती दाखवला येणार नाही. ‘ या मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील विधानानंतर आता धनंजय – करुणा संघर्षात बाजी करुणांच्या बाजूला पलटत असल्याचे दिसू लागले. त्यानंतर काही तासाच्या आतच करुणा शर्मा – मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोचल्या.
राजकारणी आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध हा नेहमीचा विषय आहे. पण ज्यावेळी या संबंधामध्ये संघर्ष उभा राहतो, त्यावेळी बहुतेकवेळा पुरुष राजकारणी मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर अशा स्त्रियांना अक्षरश: चिरडून टाकतो. एखादीच करुणा शर्मा मोठ्या लढाईसाठी उभी राहून संघर्ष करते. यामुळेच या सगळ्या संघर्षाकडे महाराष्ट्रातील असंख्यजणांचे आणि असंख्यजणींचेही बारकाईने लक्ष आहे.
याच मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर करुणा शर्मा आणि त्यांच्या बहिणीला आपल्या विरोधातील फिर्याद मागे घ्यायला लावलेले धनंजय मुंडे त्यावेळी जेव्हा परळीत परतले, त्यावेळी बुलडोझरच्या फावड्याने त्यांच्यावर गुलालाची उधळण झाली होती. जणु एखादा विजयी वीर फार मोठी लढाई जिंकून परतला होता. पण त्यांना कदाचित कळाले नसेल, पण त्याच वेळी असंख्य संवेदनशील माणसांच्या मनातील धनंजय मुंडेचे स्थान एकदम घसरले. आपल्या आणि करुणांच्या संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर याच माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता.
आता त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता धनंजयरावांना हद्यविकाराच्या त्रासाने अधुनमधुन रुग्णालय गाठावे लागते. हा त्रास ‘ करुणे ‘ मुळे सुरु झाला असे त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलेले आहे. याउलट सततचे शारिरिक आणि मानसिक हल्ले चढवूनही करुणा शर्मा पु्न्हा पुन्हा त्यांच्याविरोधात आघाडी उघडतच आहेत. परळीत त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्या गाडीत अवैध वस्तू टाकून त्यांना अटक करण्यात आली. कोल्हापूरातील निवडणूकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर धनंजयरावांच्या कृपेने त्यांना पुन्हा एकदा तुरुंगाची वारी करावी लागली.
पण आता पुन्हा फासे पलटले. राज्यात सत्तातंर झाले आणि धनंजयरावांचे मंत्रीपद गेले आणि ते आता फक्त आमदार राहिले तेही विरोधी पक्षाचे. अर्थातच ही संधी सोडतील त्या करुणा कसल्या. त्यांनी तातडीने नव्या समीकरणाचा फायदा उचलला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
करुणा मुंडे आता पुन्हा एकदा न्यूज चॅनेलवर दिसू लागल्या आहेत. आता बीड जिल्हा परिषदेच्या सर्व जागा लढविणार आणि मुंडेंना चीतपट करणार असा नवा नारा त्यांनी दिलेला आहे. त्यांची राजकीय ताकद काय आहे, याचा अंदाज कोल्हापूरमधील दारुण पराभवाने सगळ्यांनाच आला आहे, पण या सगळ्या घडामोडींनी त्या कुणाचातरी हद्यविकार पुन्हा एकदा वाढवू शकतात हे मात्र नक्की.
एका सामान्य माणसाच्या नजरेतून जेव्हा आपण या सगळ्याकडे पाहतो, त्यावेळी अर्थातच एका बाजून सत्ता, संपत्ती आणि मनगटाची अमर्याद ताकद असलेले धनंजय मुंडे असतात आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्याचीच वानवा असलेल्या व प्रतिशोधाच्या आगीत धगधगत असलेल्या करुणा शर्मा असतात. त्यामुळेच जाहिरपणे काहीही बोलले जात असले तरी आपली सहानुभुती ही करुणांकडे असते.
वर म्हणल्याप्रमाणे या सगळ्या संघर्षाची चर्चा करून तुमच्या आमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. जास्तीत जास्त काय होईल तर ज्यांच्या आयुष्यात अशी कुणी ‘ ती ‘ असेल तर त्यांच्या हद्याचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे आाता एवढ्यावरच थांबू.
आता हे रिकामटेकडे एरंडाचे गु्ऱ्हाळ येथेच थांबवु आणि आपापल्या पोटापाण्याच्या उद्योगाकडे वळूया.