मुंबई : महान्यूज लाईव्ह
नालासोपाऱ्यात नाल्यात पाय घसरून पडल्याची तक्रार ज्या मुलीबद्दल करण्यात आली होती, ती मुलगी अनेक दिवसांच्या शोधानंतर बनारस येथे सुखरुप असल्याचे आढळल्याने एका बाजुला पोलिस आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी नालासोपाऱ्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत वाहणारा हा नाला आहे तरी कोणता या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस शोधत आहेत.
१५ वर्षाची दीक्षा यादव १६ ऑगस्टला शौचासाठी म्हणून गेली, तेथून परतत असताना पाय घसरून ती नाल्यात पडली आणि बेपत्ता झाली अशी तक्रार तिच्या भावाने केली. यानंतर अग्नीशमन दलासह सगळी यंत्रणा कामाला लागली. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता, नाला भरभरून वाहत होता. प्रशासनाने सगळ्या नाल्यात शोधमोहिम राबलली. लोकांनी आणि विरोधकांनी प्रशासनावर टिकेची झोड उठवली. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाऊ लागले. सतत पाच दिवसाच्या तपासानंतर आता ही मुलगी बनारस येथे तिच्या मामाच्या घरी सुखरुप असल्याची माहिती पुढे आली आहे.
आता ही मुलगी खरेच नाल्यात पडली होती का? का हा सगळा बनाव होता, याबाबत चौकशी सुरु झाली होती. १५ ऑगस्टला या मुलीचे वडील तिला औषध न घेतल्याबद्दल ओरडले होते, त्यानंतर ही मुलगी गायब झाली असल्याची माहिती आता समोर येते आहे.
अशी कोणतीही घटना घडली की आपण लगेच प्रशासनावर खापर फोडून मोकळे होतो. पण अनेकदा प्रशासनाची काहीही चुक नसते तर चुक आपली असते. हाच धडा अशा घटना आपल्याला शिकवत असतात.