विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती पोलिसांना काल सकाळी अकरा वाजता निरोप मिळाला की, तालुक्यातील गुणवडी गावातील 11 ते 14 वयोगटातील पाच मुले बेपत्ता झाली आहेत.. राज्यातील विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने लहान मुलांच्या बाबतीत अगोदरच वेगवेगळ्या संवेदनशील विषयावर गंभीर चर्चा सुरू असतानाच बारामतीत असा प्रकार घडल्याने बारामती शहर पोलीस जास्तच सतर्क झाले आणि त्यांची धावपळ उडाली..!
संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीतील घडामोडींवर असल्याने बारामतीतून चक्क पाच मुले बेपत्ता झाल्याचा ताण पोलिसांवरही आला. सकाळी अकरा वाजता ही मुले हरवली आणि गुणवडी भागात मुले पळवून नेणारी टोळी आली असल्याच्या अफवा पसरल्या. याची माहिती संध्याकाळी चार वाजता शहर पोलिसांना मिळाली.
फौजदार युवराज घोडके यांनी ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या कानावर घातली. महाडिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुणवडी येथील या घटनेची सत्यता तपासण्यासाठी फौजदार युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सिताप, शाहू राणे यांना गुणवडी या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यास सांगितले.
गुणवडी भागातून हरवलेल्या या पाच मुलांसाठी पोलिसांनी गावातील रस्त्यावरची सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. ही पाचही भावंडे मावसभाऊ असून यात चार मुली व एक मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी देण्यास सुरुवात केली. हा तपास सुरू असताना मेखळी येथील एका दुकानदाराने पाच भावंडे आपण पाहिली असल्याची माहिती दिली.
ही मुले वालचंदनगरचा रस्ता विचारत असल्याची माहिती या दुकानदाराने दिल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा वालचंदनगर परिसरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांकडे वळवला. या ठिकाणच्या विविध दुकानांमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर जंक्शन वालचंदनगर परिसरात दोन मुली आढळून आल्या.
त्यांच्याकडे चौकशी केली असता एका मारुती ओम्नी वाहन चालकाने आम्हाला गाडीमध्ये घालून या ठिकाणी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस देखील चक्रावले. त्यांनी अधिक गांभीर्याने शोधायला सुरुवात केल्यानंतर आणखी दोन मुली आढळून आल्या. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, मात्र त्यांनी कबुली दिली की, त्यांना कोणीही गाडीत घालून आणलेले नाही, तर त्या सर्वजणी स्वतः येथे आलेल्या आहेत आणि यामागील कारण विचारले असता पोलिसांना धक्का बसला..
कोणाचाही शोध घेऊ नका ते मोठे बनूनच घरी येतील…
दरम्यान चार मुली सापडल्या, परंतु या मुलींमधील त्यांचा भाऊ प्रज्योत हा सापडत नव्हता. पोलिसांनी त्याला शोधल्यानंतर प्रज्योतने या सर्व प्रकारची पोलिसांना खरी खरी माहिती सांगितली. या पाच भावंडांपैकी तीन मुली सख्ख्या बहिणी तर एक मुलगा व मुलगी सख्खे बहिण- भाऊ आहेत. या पाचही भावंडांना अभ्यास करत नाही म्हणून मामा रागावतो. मामा सतत रागवत असल्यामुळे या पाच जणांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. यापैकी प्रज्योत याने चिठ्ठी लिहून ठेवली होती की, आता कुणाचाही शोध घेऊ नका. हे सर्वजण मोठे बनूनच घरी येतील..
या सर्व घटनेनंतर एका गंभीर तपासाचा शोध यशस्वीरित्या पूर्ण झाला, परंतु अनाकलनीय सामाजिक परिस्थितीने सगळ्यांनाच कोड्यात टाकले. संध्याकाळी उशिरा शहर पोलिसांनी ही पाचही मुले त्यांच्या आईच्या व मामाच्या ताब्यात दिली. पालकांचेही समुपदेशन यावेळी पोलिसांनी करून मुलांशी समजूतदारपणे वागा व मुलांनाही समजावून सांगण्यात आले.
हा सर्व तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून लहान मुले व महिला यांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांचा तत्काळ व संवेदनशीलपणे तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीत घडलेल्या या घटनेत पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. एक तपास संपला, परंतु प्रश्न मात्र तसेच अनुत्तरीत राहिले आहेत.
ही समस्या फक्त गुणवडी गावातील नाही, ही समस्या घराघरातील आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ती दरी कशी कमी करावी याची भीती पालकांमध्ये आहे आणि त्याचेच परिणाम दररोज दिसत आहेत.