राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खामगाव फाटा,कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळांवर अन्न औषधे विभागाच्या पथकाने नुकताच छापा टाकला. २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो भेसळयुक्त गुळ तर ८२ हजार ४४० रुपये किंमतीची २ हजार ७५० किलो भेसळयुक्त साखर अन्न आणि औषधे प्रशासन विभागाकडून जप्त करण्यात आली आहे. ही माहिती माहिती पुणे अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.
दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळ चालक हे भेसळयुक्त गुळ तयार करीत असल्याची माहिती औषध प्रशासन विभागाला मिळाल्याने अशा गुऱ्हाळांवर कारवाई करण्यास अन्न व औषध प्रशासनाने सुरुवात केली आहे. गुळात साखर,रांगोळी, मुदतबाह्य चॉकलेट,भेसळयुक्त गुळ,व साखर गुळात मिक्स करून साखर मिश्रीत गुळ वापरून बेसन युक्त गुळ तयार करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकांवर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी २०२२ मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन ३ लाख ६७ हजार ९०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार १६२ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती.या प्रकरणी घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस,कानगाव, पारगाव,नानगाव, केडगाव, व राहु परिसरात अनेक भेसळयुक्त गुळ तयार करणाऱ्या गुऱ्हाळे प्रशासनाच्या रडारवर आहेत. भेसळयुक्त गुळ तयार करताना आढळून आल्यास संबंधित गुऱ्हाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.
दरम्यान, या गुऱ्हाळातुन निघणाऱ्या प्लास्टिकच्या विषारी धुरामुळे डोळे लाल होणे,डोके दुखणे,नाक चुरचुरने,दमा असलेले,वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना या धुरामुळे श्वसनाच्या विकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी भविष्यात फुफ्फुसाचे गंभीर आजार नागरिकांना झाल्याशिवाय राहणार नाहीत. पाटस,कानगाव,हातवळण,नानगाव, केडगाव, पारगाव, लडकतवाडी,नाथाचीवाडी,पिंपळगाव,खुटबाव,देलवडी,यवत,
केडगाव, गलांडवाडी, खामगाव,तांबेवाडी,कासुर्डी परिसरात भर लोकवस्तीत असणाऱ्या गुऱ्हाळांवर मोठ्या प्रमाणावर चप्पल, प्लास्टिकचे साहित्य,टायर मोठ्या प्रमाणात जाळण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असुन नागरिकांना या विषारी धुरामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लोकवस्तीत असणाऱ्या गुऱ्हाळ चालकांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. भेसळयुक्त गुळ बनवणाऱ्या व प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळ चालक व मालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.