शशांक मोहिते, बारामती
मराठी माणसाने आपली नोकरीच करावी, मराठी माणसाला उद्योग जमत नाही असा शेरा मारणारे सल्लागार आपल्या आसपास सतत भेटत असतात. पण जर आजुबाजूला नीट लक्ष दिले तर स्वत:च्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर मोठा उद्योग उभारलेले अनेक उद्योजक आपल्या अवतीभवती आपल्याला दिसतात.
सचीन लावंड अशाच काही लोकांमधील एक. साताऱ्याचा माण खटाव हा भागाची पुर्वीपासून दुष्काळी म्हणूनच ओळख. पण या या भागातील माणसे मात्र कष्टाळू आणि मेहनती. याच खटाव तालुक्यातील दरुज हे सचीन लावंड यांचे गाव.
सचीन हे मुंबईत अकाउंटंट म्हणून काम करत होते. पण काहीतरी वेगळे आणि मोठे करण्याकडे त्यांच्या उद्यमशील मनाचा कल होता. यातूनच आपल्या काही व्यावसायिक मित्रांसोबत त्यांनी इलेक्टॉनिक्स उत्पादनांचे मार्केटींग करणाऱ्या एका कंपनीत संचालक म्हणून ५ वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु करण्याचे ठरवले.
विशेष म्हणजे त्यांच्या या विचाराला त्यांच्या घरच्यांनी मनापासून साथ दिली. अगदी आईच्या पेन्शनवर, पत्नीचे सोने गहाण टाकून, भावाच्या पगाराच्या स्लीपच्या आधारावर कर्ज काढले. त्यात स्वत:ची बचतही टाकली. असे करून पंचवीस लाखाचे भागभांडवल त्यांनी गोळा केले. खरे पाहता त्यांनी फार मोठा धोका पत्करला होता. पण त्यांचा स्वत:वर आणि त्यांच्या घरच्यांचा त्यांच्यावर विश्वास होता.
या २५ लाखाच्या भागभांडवलावर Glister या इलेक्टॉनिक्स वस्तुच्या ब्रॅंडचा जन्म झाला. बल्ब, ट्युबलाईट, बॅटरी, पंखे, स्विचबोर्ड यासारख्या २०० इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे उत्पादन आणि विक्री या ब्रॅंडच्या अंतर्गत सुरु झाली. २०१७ साली सुरु झालेल्या या कंपनीची उलाढाल आता पाचव्या वर्षी ३० कोटीवर जाऊन पोचली आहे.
अर्थातच हा पल्ला प्रचंड मेहनतीचा, चढउतारांचा आणि खाचखळग्यांचा होता. पण अचुक नियोजन आणि उत्तम संघटनकौशल्याच्या बळावर हे साध्य झाले . सचीनजींनी मुंबई, नवी मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत विक्रीसाठी ७० डिस्ट्रीब्युटरचे जाळे विणले.
३५ जणांची मार्केटींग टीम उभी केली. या आधारावर पहिल्या वर्षी दीड कोटी, दुसऱ्या वर्षी ८ कोटी, तिसऱ्या वर्षी १८ कोटी, चौथ्या वर्षी २४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली. त्यानंतर आता पाचव्या वर्षी ३० कोटीची टप्पा गाठण्यात त्यांना यश आले आहे.
काल गप्पा मारताना सचिन म्हणाले, सर, दर महिन्याला आपण Glister कंपनीचे जवळपास १ लाख बल्बची विक्री करतो. काल शनिवारी सचिनजींच्या निमंत्रणामुळे कामोठे,पनवेल येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयाला भेट झाली. अशा सकारात्मक व्यक्तींना भेटायला, त्यांच्याशी बोलायला मला फार आवडते. आपलेही जगणे कळत नकळत समृध्द होत जाते हे मात्र नक्की..!
(लेखक, राज्यातील प्रसिद्ध भाषण कला प्रशिक्षक व मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. संपर्क : 9960066966)