बारामती : महान्यूज लाईव्ह
महिला सक्षमीकरणाची ज्योत बारामतीने गेली अनेक दशके तेवत ठेवली आहे. विशेषतः शारदानगरच्या शैक्षणिक संकुलातून महिला सबलीकरणासाठी होत असलेले आश्वासक व शाश्वत प्रयत्न अनेकांच्या आयुष्यात व कुटुंबांसाठी महत्वाचे ठरले आहेत. रेश्मा पुणेकर नंतर बारामतीच्या शारदानगर शैक्षणिक संकुलाने पाठबळ दिलेली किरण नवगिरे आता भारतीय महिला संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणार आहे. माळशिरस तालुक्यातील या कन्येचा बारामतीकरांनाही तेवढाच अभिमान आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या किरण नवगिरेचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये आणि कारणही तसेच आहे. किरणची आता भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. लवकरच ती आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. बारामतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे किरण नवगिरे ही अॅग्रीक्लचर डेव्हलपमेंट ट्रस्टची माजी विद्यार्थिनी आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील या मुलीने श्रीपूर जवळच्या मिरे गावात प्राथमिक शिक्षण तर श्रीपूरच्या चंदशेखर आगाशे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. जून २०१२ पासून बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला व संस्थेच्याच कर्मवीर योजनेतून ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांनी तिची दत्तक पालकत्वासह संपूर्ण मोफत शिक्षणाची सोय केली होती
संस्थेने महाविद्यालयाच्या मार्फत अद्ययावत अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. सातत्याने तिच्या कामगिरीची दखल घेऊन तिला सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षक व प्रशिक्षणे मिळवून दिली. महाविद्यालयाचे तत्कालीन क्रीडा संचालक प्रा. आर. बी. देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली किरणने महाविद्यालयाचे व पुणे विद्यापीठाचे राज्यपातळी व देशपातळीवर नेतृत्व केले. महाविद्यालयीन काळात तिने विविध खेळात नैपुण्य मिळविले. सर्वोत्कृष्ठ खेळाडू, सर्वोत्कृष्ठ संघनायक इ. पुरस्कार राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळविले. या काळात तिने भालाफेक, बेसबॉल, सॉफ्टबॉल व अथेलिटिक्स सारख्या खेळात पदके मिळवून महाविद्यालय व पुणे विद्यापीठाला अनेक पदके व पुरस्कार मिळवून दिले.
बारामतीत घडलेली किरण आता महिला क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज आहे. १९ ऑगस्ट रोजी बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या टी २० साठीच्या संघात किरणचा समावेश आहे. किरण सध्या नागालँडच्या महिला संघामधून खेळते, 2022 मध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्ध खेळताना तिने महिला वरिष्ठ टी – २० ट्रॉफीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला. निवडीनंतर बोलताना ती म्हणाली, निवडीच्या आलेल्या दूरध्वनीनंतर मला काही काळ जणू स्वप्नात असल्यासारखे वाटत होते. परंतु त्यानंतर सुरु झालेल्या दूरध्वनींवरुन स्वप्न सत्यात उतरत असल्याचे जाणवले आणि क्रीडा क्षेत्रातील व इथपर्यंतचा प्रवास डोळयासमोर आला. खूप समाधान वाटते. आता मी भा्रताचे यशस्वी प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज आहे.
अर्थात किरणचा हा प्रवास सोपा नव्हता व सहजासहजी घडलेला नाही.. सन २०१२ ते २०१६ या पाचवर्षाच्या संस्थेतील पदवी शिक्षणानंतर ती पुढील शिक्षण व प्रशिक्षण पुण्यामध्ये घेत राहिली. दरम्यान आर्थिक परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नव्हती. पण खेळातील घौडदौड सुरुच होती. १५ एप्रिल २०१९ रोजी रणजी संघाच्या निवडी वेळी अत्यावश्यक गुणवत्तेच्या क्रिकेट साहित्या अभावी तिच्या कामगिरीवर परीणाम होत असल्याचे समजताच सुनंदाताई पवार यांनी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामार्फत अत्याधुनिक अद्ययावत असे सर्वोच्च गुणवत्तेचे क्रिकेट साहित्य देऊन तिला पुन्हा प्रोत्साहित केले.
दरम्यान २६ जानेवारी २०१९ च्या ध्वजारोहण समारंभासाठी संस्थेने तिला निमंत्रित केले होते. या दिवशीचे ध्वजारोहण करण्याचा मान देऊन संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी तिचा उचित गौरव व सन्मान केला. किरणच्या या निवडी नंतर सुनंदा पवार यांनी दूरध्वनीवरुन किरणचे अभिनंदन केले व तिला इंग्लंड दौ-यासाठी शुभेच्छा दिल्या. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे, समन्वयक श्री. प्रशांत तनपुरे, मनुष्यबळ विकास अधिकारी गार्गी दत्ता व प्राचार्य डॉ. महामुनी यांनी तिचे अभिनंदन केले.