इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे 35 वर्षीय आरोपीने मुलीवर बलात्कार करत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने चारचाकी मधून दोन साथीदारांनी येऊन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार वालचंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल हनुमंत जाधव यास अटक केली आहे, तर दोघे फरार आहेत.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. राहुल जाधव याने या पीडीतेला एका शेतात ओढत नेले व तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने मारुती ओमिनी या चार चाकीमधून त्याचे दोन साथीदार आले. या दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. त्यापैकी एकाने या पीडितेवर बलात्कार केला आणि त्याच गाडीतून थोड्या वेळाने आरोपींनी तिला बेलवाडीच्या बसस्थानकावर सोडले अशी तक्रार दिली तिच्या आईने वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून जाधव यास अटक केली. दरम्यान पोलिसांनी आणखी दिलेल्या माहितीनुसार राहुल जाधव याने घटनेनंतर चार वाजता चारचाकी गाडीतून पिडीतेच्या घरासमोर येऊन पिडीतेच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.