सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या अद्यापही रखडल्या असताना आता इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील एका नवोदित कलाकाराने मला आमदार व्हायचंय ! अशी इच्छा राज्यपालांकडे व्यक्त केली आहे. ‘बाबा गणपत गायकवाड’ असे या कलाकाराचे नाव असून, तो ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मराठी मालिकेत “रघु” या पात्राची भूमिका साकारत आहे.
या मालिकेमध्ये अकराशे पेक्षा जास्त भागात त्यांनी आपली भूमिका उत्कृष्टपणे केली आहे. दरम्यान बाबा गायकवाड या कलाकाराने राज्यपाल यांची सदिच्छा भेट घेवून चर्चा केली. आपण हिंदी व मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कला क्षेत्रातून आपल्याला विधानपरषदेवर पाठवून आमदार होण्याची संधी द्यावी अशी विनंती या कलाकाराने राज्यपालांकडे केली आहे.
विशेष म्हणजे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील भरणेवाडीचेच रहिवासी आहेत. या कलाकाराने बुधवारी ३ ऑगस्ट रोजी मेलद्वारे केलेल्या या मागणीला राज्यपालांकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नसले तरी, राज्यपालांनी संधी दिलीच तर भरणेवाडीतून एकाच वेळी दोन आमदार इंदापूर तालुक्याला मिळतील, अशी चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे.