बारामती : महान्यूज लाईव्ह
निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर बारामती शहरातील सुशोभीकरणाच्या माध्यमातून हे अस्तरीकरण पूर्ण झाले आणि त्यानंतर जेव्हा ग्रामीण भागात याला सुरुवात झाली, तेव्हा हळूहळू शेतकऱ्यांमध्ये विरोध सुरू झाला. आपल्या विंधन विहिरी आणि कालव्याच्या कडेच्या विहिरी यांचे पाणी जाईल आणि पुन्हा आपला भाग ओसाड होईल म्हणून शेतकरी एकवटले आणि त्याला हळूहळू राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला. याची कुणकूण लागताच आता निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला तूर्तास ब्रेक देण्यात आला आहे.
या संदर्भात जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील हे काम थांबवण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान हे काम थांबवल्याने हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे काही जण म्हणतील देखील; परंतु यामुळे अनेक भविष्यातील प्रश्न अनुत्तरीत राहिले आणि राहणार आहेत.
कालव्याच्या अस्तरीकरणाला गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विरोध सुरू झाला. सुरुवातीच्या काळात याकडे कोणाचे लक्ष नव्हते, मात्र जसे जसे अस्तरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तसे तसे शेतकरी अस्वस्थ होत गेले. पणदरे येथे या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याचे लोण इंदापूर व बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी पोचले. कन्हेरी, कोऱ्हाळे बुद्रुक तसेच इंदापूर तालुक्याच्या विविध भागात देखील या संदर्भात बैठका झाल्या आहेत.
निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर वर्षानुवर्षी कालव्याच्या वितरिकेवर अवलंबून असणारे शेतकरी या निर्णयाने सुखावले होते तर कालव्याच्या कडेला एक- दोन गुंठे, चार गुंठे जमिनी घेऊन ज्यांनी तेथे विहिरी खोदून पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरील इतर गावांमधील आपली शेती बागायती केली असे शेतकरी मात्र अस्वस्थ झाले होते.
त्याचबरोबर ज्यांच्या जमिनी या कालव्यासाठी संपादित झाल्या, ते कालव्याच्या कडेचे शेतकरी देखील या निर्णयामुळे अस्वस्थ झाले होते. बारामती शहरातून अस्तरीकरण होत असताना काही ठिकाणच्या विंधन विहिरींचे पाणी गेले अशा प्रकारची ओरड काही जणांनी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या या अस्वस्थतेला अधिक स्वरूप आले. त्याला उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी एकत्र आले.
गेल्या काही दिवसात बारामती आणि इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी याच्या बैठका सुरू झाल्याने हे आंदोलन उग्र आणि तीव्र स्वरूप धारण करेल याची कुणकूण लागताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि हे अस्तरीकरणाचे काम तूर्तास थांबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.
अस्तरीकरणामुळे निरा डाव्या कालव्याच्या कडेच्या भागात पाझरामुळे होणारा फायदा संपेल आणि ज्या कालव्याच्या कडेच्या जमिनी बागायती झाल्या आहेत, त्या ओसाड होतील ही शेतकऱ्यांची भीती अगदीच निराधार नाही. कारण बारामती व इंदापूर तालुक्याचा बहुतांश भाग हा तसा पाहिल्यास कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळे या भागात पाण्याचे जिवंत स्त्रोत कोणालाही नाहीत.
कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून असणारी हजारो हेक्टर शेती आणि त्यामुळे उसाच्या उत्पादनात झालेली वाढ हे येथील अर्थकारणाचे प्रमुख चक्र आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाचा फायदा शेवटच्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत होईल, परंतु यामुळे जे शेतकरी सध्या ऊर्जितावस्थेत आहेत, त्यांची मात्र वाट लागेल. म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध वाढला होता.
आता हे शेतकरी शांत होतील, परंतु अस्तरीकरणाच्या निर्णयामुळे ज्यांना फायदा होऊ शकला असता व आवर्तनाचा कालावधी कमी होऊन वेळेवर व पुरेसे पाणी मिळाले असते, असे शेतकरी आता नव्याने आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण जेव्हा या अस्तरीकरणाला विरोध सुरू झाला, तेव्हाच अस्तरीकरण हवे असे म्हणणाऱ्यांचा गट देखील प्रभावी बनत गेला आहे. विशेषतः इंदापूर तालुक्यात आणि बारामती तालुक्यात वितरिकेवर अवलंबून असणारे शेतकरी अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर सकारात्मक होते, केवळ अस्तरीकरण नसल्यामुळे व पाझर जास्त झाल्यामुळे आणि पाण्याची चोरी जास्त होत असल्यामुळे या वितरिकेवरील अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नव्हते.
ते पाणी व्यवस्थितरित्या मिळेल अशी या शेतकऱ्यांना खात्री आहे. त्यामुळेच अस्तरीकरणाला विरोध करणारा एक गट आणि अस्तरीकरणाचे समर्थन करणारा एक गट अशा दोन गटांची स्पर्धा येत्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शेतकऱ्यांच्या या मुद्द्याचे भावनिक राजकारण करून त्याला उग्र स्वरूप देत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देखील या आंदोलनाच्या माध्यमातून होणार होता. या सर्वांची कुणकुण लागल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून हे अस्तरीकरण सध्या थांबवले असल्याचे सांगितले जात आहे.