शिरूर : महान्यूज लाईव्ह
2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेल्या अच्छे दिनवाल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आतबट्ट्याच्या शेतीला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी उणे सबसिडीचा सिद्धांत मांडला होता. भारतातील शेती ही नेहमीच आतबट्ट्याची शेती ठरली आहे. त्याचाच एक दृश्य परिणाम शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यानं अनुभवला. त्याच्या हाती अवघ्या साडे नऊ रुपयांची पट्टी आली. यावर संबंधित शेतकऱ्याने साडे नऊ रुपयांचा चेक परत व्यापाऱ्याला देऊ केला आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. ही तरकारी पिके पुणे, मुंबई, सुरत ,आदी ठिकाणी दररोज पाठवली जातात.
मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी मोठ्या आशेने फ्लॉवर ची लागवड केली. खते व औषधे देत पीक देखील जोमदार आले होते. तोडणी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे फ्लॉवर विक्री साठी पाठवले होते. यावेळी सर्व खर्च वजा जाता हाती अवघ्या ९ रुपये ५० पैसे इतकी पट्टी लागली. यामुळे फराटे यांची मोठी निराशा झाली आहे.
याविषयी त्यांनी बोलताना सांगितले की, फ्लॉवरची चांगला बाजारभाव मिळेल म्हणून लागवड केली होती. मात्र ही आशा फोल ठरली असून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच संबंधित व्यापाऱ्याकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून शेतमालात जर फसवणूक होत राहिली, तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही असे ही बोलताना त्यांनी सांगितले.