दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील पाच भटक्या कुत्र्यांवर अज्ञात व्यक्तींनी ऍसिड (रासायनिक) टाकून हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्या हल्ल्यात पाच कुत्रे गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पाटस गावठाण परिसरात वावरत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या अंगावर काही अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारची आरोग्यास हानिकारक रासायनिक टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दोन दिवसांत पाच भटकी कुत्री या प्रकाराने गंभीर स्वरूपात जखमी झाली असून मागील दोन दिवसांपूर्वी दोन कुत्री या रसायनामुळे दगावली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी रुपेश रोकडे, चैतन्य बंदिष्टी, विनोद कुरुमकर, अमोल शितोळे, सुयोग कुलकर्णी, अक्षय टिळके, ओंकार पंडित, अर्णव रंधवे आदी ग्रामस्थांनी याबाबत तपास करून कारवाई करण्यासंदर्भात पाटस पोलीस चौकीत निवेदन दिले आहे.
दरम्यान, याबाबत कुरकुंभ पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय काकडे यांनी या जखमी कुत्र्यांची पाहणी करुन तपासणी केली. रासायनिक (ऍसिड ) टाकल्यानेच कुत्रे जखमी झाले आहेत हे म्हणणे चुकीचे ठरेल. या घटनेला चार पाच दिवसांचा कालावधी गेला असून त्याची लगेच त्याच दिवशी तपासणी करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असते, तर या जखमा नेमक्या कशाच्या आहेत हे या अहवालानंतर समजले असते, मात्र, रसायनामुळेच कुत्रे जखमी झाले नसल्याचे डॉ. काकडे यांनी सांगितले.