राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथील एका हॉटेलमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदा बिअर बारवर पाटस पोलिसांनी छापा टाकला, तसेच कानगाव येथील मुख्य चौकातील हॉटेल हनुमान याठिकाणी बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करीत ह्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. कानगाव – मांडवगण फराटा रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गारवा मध्ये मागील काही दिवसांपासून खुलेआमपणे बेकायदा बिअर बार चा व्यवसाय तेजीत सुरू होता. या ठिकाणी बिअर, देशी – विदेशी दारूची खुलेआम विक्री केली जात होती.
या ठिकाणी कानगाव,मांडवगण परिसरातील मद्यपी बसून मद्यपान करीत होते. तर रस्त्यालगत हा खुल्यामपणे बेकायदा दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने कानगाव -मांडवगण रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवासांना मद्यपान करणाऱ्या व्यक्तींचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच लोक वस्ती जवळच हा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनाही याचा मोठा त्रास होत होता.
त्यामुळे या हॉटेलवर वर सुरू असलेली बेकायदा दारू विक्री बंद व्हावी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कानगाव ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर, गणेश मुटेकर, समीर भालेराव आदींनी शुक्रवारी ( दि.१९) रात्री ह्या हॉटेलवर धाड टाकून धडक कारवाई केली.
यावेळी या ठिकाणी खुलेआम बिअर, देशी विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचे या पथकाला निदर्शनास आले. किरण पुनम राठोड (वय 22 , रा.कानगाव ता.दौंड जि.पुणे मुळ रा.मांडणगण – फराटा ता.शिरुर जि.पुणे ) हा कानगाव हद्दीतील विसावा हॉटेल च्या आडोशाला बेकायदा बिगर परवाना देशी- विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळुन आला.
देशी विदेशी दारूची खुलेआमपणे विक्री होत असल्याचे यावेळी पोलीसांना निदर्शने आले. पोलिसांनी बिअर, देशी विदेशी दारूच्या बाटल्या व मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी गणेश परशुराम को-हाळे,व बाळु अडागळे (पुर्ण नाव माहित नाही, दोघेही रा. कानगाव ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाटस पोलीस चौकीचे पोलीस शिपाई गणेश मुटेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तसेच कानगाव गावातील मुख्य चौकातील हनुमान हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला या ठिकाणी या हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.
पोलीसांनी या दारूच्या बाटल्या व मुद्देमाल जप्त करत दत्तात्रय भिमराव हत्तीकट (वय २२, सध्या रा. कानगाव ता. दौंड जि.पुणे मुळ रा. बेलवंडी ता. कर्जत जि. अहमदनगर ) व नितीन एकनाथ फडके (रा. कानगाव ता. दौंड जि. पुणे.) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, पाटस पोलीसांनी कानगाव हद्दीतील दोन हॉटेलवर धाड टाकून या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा देशी – विदेशी दारूच्या बाटल्या व मुद्देमाल जप्त करीत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत मात्र, पोलीसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या उर्वरित इतर आरोपी ही मागील अनेक दिवसांपासून ह्या ठिकाणी हा दारु विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी ग्रामस्थ विशेषतः महिला करीत आहेत.