विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
मोटर सायकल चोरायच्या.. उकिरड्यात लपवायच्या.. कोणाच्याही बापाला दिसणार नाहीत अशी मर्दुमुखी गाजवायची आणि फक्त चैनबाजी करण्यासाठी अनेकांनी कष्टाने घेतलेल्या दुचाकी चोरायच्या असे काम करणाऱ्यांना बारामतीच्या तालुका पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या वर्षभरात मोटरसायकलींची चोरी वाढली होती आणि पोलीस यासंदर्भातील मागावर होते. विशेषत: नेमक्या कोणत्या भागातून मोटरसायकली अधिक जातात याची माहिती काढत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तालुका पोलीस ठाण्याची पथके या चोरीच्या तपासासाठी लावली होती आणि पोलिसांनी बारामतीची धडकी भरवेल अशी कामगिरी केली. तब्बल दोन टेम्पो भरतील एवढ्या 27 दुचाकी बारामती तालुका पोलिसांनी अतुलनीय कामगिरी करत बीड व नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्या.
मागील काही महिन्यापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पीटल, व्ही.पी कॉलेज, पेन्सिल चौक परिसरातून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने शशिकांत दळवी, दिपक दराडे यांना दिली होती.
या पथकाने अत्यंत कसून काही दिवस बारकाईने यावर नजर ठेवली व चोरांचा माग काढला. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील यांनी तपासले. तसेच वाटेवरील विविध गावांतील सीसीटीव्ही फुटेज देखील या काळात तपासले. बराच मोठा तपासाचा भाग उरकल्यानंतर पोलीस पुणे जिल्ह्याबाहेरचे चोरटे यामध्ये आहेत या निष्कर्षापर्यंत आले.
या तपासानंतर त्यांनी संशयितांची यादी तयार केली आणि विजय अशोक माने (वय 19 वर्षे), 2 प्रदिप रघूनाथ साठे (वय 22 वर्षे, सध्या राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा) 3. प्रेम सुभाष इटकर (वय 19 वर्षे दोघे राहणार. मिलींदनगर, जामखेड, जि. अहमदनगर), 4. संतोष तुकाराम गाडे (वय 42 वर्षे रा. अंमळनेर,ता.पाटोदा,जि.बीड) यांना ताब्यात घेवून वेगवेगळया युक्त्या वापरून त्यांना बोलते केले.
या चोरट्यांनी आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्या असून त्यापैकी 27 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. यामध्ये आरोपींना वेगवेगळ्या युक्त्या वापरून बोलते केले आणि त्यांचा भंडाफोड झाला. अगदी उकिरड्यांमध्ये तसेच गवताच्या गंजीमध्ये चोरलेली वाहने हे आरोपी लपवून ठेवायचे. व्यवहार झाल्यानंतर ही दुचाकी विकली जायची.
आता पर्यंत स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 13लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 27 दुचाकी मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अटक केलेले आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी दरोडयाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी बारामती, जामखेड, बीड आदी भागांमध्ये गुन्हे केलेले आहेत. हे सराईत गुन्हेगार आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवा. राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केली.