शिरूर : महान्यूज लाईव्ह
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार (दि.१९) रोजी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. माजी आमदार पाचर्णे हे आजाराशी झुंज देत असताना राज्यातील अनेक नेत्यांनी पाचर्णे यांना भेट घेण्यासाठी धाव घेतली होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाचर्णे यांची रुग्णालयात उपचार सुरुर असताना भेट घेतली होती. दरम्यान पाचर्णे यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी शिरूर येथील निवासस्थानी पाचर्णे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे सुपुत्र राहुल, तसेच पत्नी मालती ताई व कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.
या सर्वांची विचारपूस करून पवार यांनी सांत्वन केले. तसेच काळजी घ्या असा सल्ला ही यावेळी त्यांनी दिला. यावेळी दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, राष्ट्रवादी व भाजपचे स्थानिक पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.