दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव येथे चौकात मद्यपान करून हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दारुड्याला पाटस पोलीसांनी अटक केली.
ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे व सहाय्यक फौजदार सागर चव्हाण यांनी दिली. गणेश लक्ष्मण फडके ( रा.कानगाव ता.दौंड जि.पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
गुरुवारी (दि.१८) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कानगाव येथील यादव काॅम्पलेक्सच्या समोर रोडवर गणेश फडके हा दारूच्या नशेत हातामध्ये धारदार कोयता घेऊन गावामध्ये मोठमोठयाने आरडाओरड करून शिवीगाळ करून गावामध्ये दहशत करीत होता.
याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार व पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भानुदास बंडगर, संजय देवकाते, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव, हनुमंत खटके आदींनी घटनास्थळी धाव घेत फडके यास ताब्यात घेतले.
पोलीस शिपाई हनुमंत खटके यांनी फिर्याद दिल्याने फडके याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व मुंबई दारूबंदी अधिनियम तसेच क्रिमीनल अमेंडमेंट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.