दौंड : महान्यूज लाईव्ह
पुण्याच्या खाजगी सावकाराने शेतकऱ्याने घेतलेले व्याजाचे पैसे व्याजासहित पैसे परत केले असतानाही शेती व गाडी आमच्या नावावर कर यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती यवत पोलिसांनी दिली. प्रकाशशेठ केदारमल खंडेलवाल व अमितशेठ प्रकाशशेठ खंडेलवाल (रा. साकेत इलेक्ट्रानिक, फडके चौक, पुणे) अशी या सावकारांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राहु येथील शेतकरी संतोष परशुराम शिंदे यांनी या सावकाराकडून ७ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतलेले होते. या शेतकऱ्याने ७ लाख ५० हजार रुपयांचे व्याजासह १२ लाख ५० हजार रुपये सावकाराला परत केले असतानाही या सावकाराने शेतकरी संतोष शिंदे यांच्या सहया घेतलेले शंभर रूपये स्टॅम्प पेपर परत केले नाहीत,
उलटपक्षी पैशाचा तगादा लावुन शेती किंवा गाडी आमच्या नावावर करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद शिंदे यांनी यवत पोलीस स्टेशनला दिली आहे. या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.