राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील मलठण, राजेगाव, वाटलुज, शिरापुर येथील भिमा नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी सात जणांवर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र दहा दिवस उलटले, तरी अद्याप या वाळूमाफियांना अटक झालेली नाही.

यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत असून पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. दौंड पोलीस व पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील मलठण येथील भीमा नदीच्या पात्रात बेकायदा यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताब्यात घेऊन कारवाई केली होती.
मलठण, वाटलुज, राजेगाव, हिंगणीबेर्डी व शिरापूर या गावांमधील भिमा नदीच्या पात्रात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा व वाहतूक सुरू होती. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या कडे केल्याने देशमुख यांच्या आदेशानुसार पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून सहा ट्रक व १२ ब्रास वाळू ७२ लाख ३३ हजार किंमतीचे मुद्देमाल जप्त केला.
याच घटनेत दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू फायबर बोटीसह पाण्यात बुडून नष्ट करुन कारवाई केली होती. याप्रकरणी गणेश मारूती शेंडगे, घनशाम विश्वनाथ देवकाते, नवनाथ दगडू वाघमोडे, गोरख नामदेव वाघमोडे,आबा पाडूरंग सरोदे ,गोरख अरूण वाघमोडे सर्व (रा.मलठण ता.दौंड जि पुणे) व संभाजी मनोहर येडे (रा.खानावटा ता.दौंड जि पुणे ) या वाळु चोरांवर विविध गुन्हे दाखल केले आहेत.
आता गुन्हा दाखल होऊन दहा दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप या वाळूचोरांना अटक केलेले नाही. हे वाळूचोर बिनधास्तपणे गावात वावरत आहेत. मात्र तरीही हे वाळू चोर पोलीसांच्या हाती लागत नाहीत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी असल्यानेच त्यांना अटक केली जात नाही असा आरोप या परिसरातील शेतकरी करीत आहेत.
दरम्यान, याबाबत या प्रकरणाचा तपास करणारे दौंड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार संतोष शिंदे म्हणाले की, तपास सुरू असुन अटक करण्यासाठी गेल्यावर आरोपी पसार होत आहेत. मात्र त्यांना लवकरच अटक केली जाईल.