सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करून गैरवर्तन केले. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली असून भिगवण पोलिसांनी गांभिर्य लक्षात घेत बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत या शिक्षकाला अटक केली.

या शिक्षकाने सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केले. या शिक्षकाने यापूर्वीही तीन चार महिन्यापूर्वी असाच प्रकार केल्याची तक्रार पालकांनी केली होती. मात्र त्यावेळी शाळेनेच फारसे गांभिर्याने घेतले नव्हते, फक्त माफीनामा लिहून घेतला होता, त्यामुळे त्याचे धाडस वाढले. दादासाहेब अंकुश खरात असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.
दरम्यान आता घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर मुलीच्या पालकाने थेट भिगवण पोलिसांकडे धाव घेतली व खरात याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून भिगवण पोलिसांनी खरात विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
तुझे नाव मी दिलाच्या आकारात माझा हातावर लिहीलंय…
जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 6 वी च्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात ठेवून तिला तू शाळेत रोज येत जा, तू नाही आली तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझे नाव माझ्या हातावर दिलाच्या आकारात लिहले आहे असे म्हणत या नराधमाने तिच्याशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र भेदरलेल्या मुलीने या नराधमाच्या हातून कशीबशी सुटका करून घरी पळ काढला आणि आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत लागलीच धाव घेत या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान असा प्रकार घडलेला असल्याची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह भेट दिली. संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले व आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.