बारामती महान्यूज लाईव्ह
गुन्हेगारीला वय राहीलंच नाही.. मिसरूड फुटायच्या आतच पोरं दुसऱ्याला ढगात पोचवायची भाषा करू लागली आहेत.. बारामतीत तर पोरांनी त्यांच्या वयाच्या पोराच्या भांडणात थेट एका ५० वर्षीय बापालाच संपवून टाकलं.. या घटनेने बारामतीसह फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बारामतीतील श्रीरामनगरमधील शशिकांत कारंडे हे त्यांच्या सातवीत शिकत असलेल्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गेले असता तीन अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्याने त्यांच्यावर जोरदार वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी भयाण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कविवर्य मोरोपंत हायस्कूल शाळेच्या आवारात हा खून झाला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून भरदिवसा खून झाल्याने त्याची अस्वस्थता अधिक वाढली आहे. श्रीरामनगर हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांत परिसर आहे. या परिसरात तेही अल्पवयीन मुले येऊन कोणाचीही भीडभाड न ठेवता खून करतात या घटनेनेच बारामती शहरातील अस्वस्थता वाढली आहे.
या घटनेत मृत्यू पावलेले शशिकांत कारंडे हे फलटण तालुक्यातील मठाचीवाडी गावचे रहिवासी आहेत. इतर पालकांप्रमाणेच मुलांच्या शिक्षण व कामानिमित्ताने ते बारामतीत भिगवण रस्त्यावरील त्रिमुर्तीनगर येथे राहत होते. त्यांची मुलगी कविवर्य मोरोपंत शाळेत शिकत असल्याने तिला ने-आण करण्यासाठी ते येथे येत होते. कारंडे यांचा मुलगा एका मुलीशी बोलताना काही मुलांनी पाहिले, त्यावरून कारंडे यांच्या मुलावर या वर्षीच्याच मे महिन्यात प्राणघातक हल्ला झाला होता.
त्यावरून शशिकांत कारंडे यांनी हल्ला करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजरही केले होते.
त्याचाच राग मनात ठेऊन अल्पवयीन मुलांनी शशिकांत कारंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप कारंडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. डोक्यावर आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने कारंडे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांची 3 पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवली आहेत. पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.