दौंड : महान्यूज लाईव्ह.
दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनसाठी जागा, दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी द्या व पाटस पोलीस चौकीला स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्याच्या प्रस्तावास मान्यता द्या! या संदर्भात दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले.
मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे १९८० च्या सुमारास पोलीस स्टेशन मध्ये रुपांतर झाले आहे. या पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी निवासस्थाने, संचालन मैदान व अपघात व कार्यवाहीत पकडलेली वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
यवत पोलीस स्टेशनकडे सुमारे ५२ गावांचे, ३७ किलो मीटर महामार्गालगतचे कार्यक्षेत्र आहे. उक्त गावांच्या हद्दीतून रेल्वे मार्ग, नदी, घाटरस्ते, वाढते औद्योगिकरण यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. १९८० साली पोलीस स्टेशनचा विस्तार झाला परंतु इमारत जुनीच राहिली.
त्याभोवती नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यामुळे पूर्वीची जागा अपुरी पडू लागली आहे. या परिसरात कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उपलब्ध नसल्याने या ठिकाणचे अधिकारी इतरत्र राहत असल्यामुळे आपतग्रस्त परिस्थितीत या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याची घटना अनेक वेळा उघडकीस आली आहे.
याबाबत या ठिकाणी जवळच शासन नावे असलेली जागा पोलीस स्टेशनाला मिळणेबाबतचा प्रस्ताव १६ फेब्रुवारी २०२२ वा त्यापूर्वीपासून त्रुटींची पूर्तता करून शासन दरबारी दाखल करण्यात आला आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन बांधकामास सुमारे ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला असून जागे अभावी अद्याप काम सुरु झालेलं नाही.
त्यामुळे सदर जागा मिळण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी तसेच दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी देखील निधी मिळण्याची आवश्यकता आहे अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा सुधारित आकृतीबंधामध्ये सध्या यवत पोलीस स्टेशनच्या अंकीत असलेल्या पाटस या ठिकाणी असलेल्या चौकी ही या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन निर्माण करणे बाबतच्या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला आहे.
पोलीस दलाचा सुधारित आकृतीबंध वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने हे पाटस येथील पोलीस स्टेशन सुरु करता येणे शक्य आहे. यवत पोलीस स्टेशनच्या नवीन बांधकामास जागा, दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत व पाटस येथील नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी.अशी आग्रही मागणी आमदार कुल यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, याबाबत शासनाने त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.