सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
सत्य परेशान हो सकता है… पराजित नही.. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी क्रमांक १ मधील सामान्य व्यक्तीने प्रशासकीय कामकाजातील जाणीवपूर्वक चुका व भ्रष्ट मनमानीविरोधात तब्बल १६ वर्षे सनदशीर लढा दिला. अखेर पोलिसांना ग्रामपंचायतीतील भ्रष्ट प्रवृत्तीची दखल घ्यावीच लागली. इंदापूर पोलिसांनी एका मृत व्यक्तीसह १४ जणांविरोधात गु्न्हा दाखल केला असून यामध्ये तब्बल ६ शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत.
या लढ्याची सुरवात २००६ मध्ये झाली. गावातील हनुमंत वसंत कदम यांनी हा लढा दिलाय. यावरून इंदापूर पोलिसांनी तत्कालीन विस्ताराधिकारी जी.एम. दराडे, प्रशांत बगाडे, या काळातील सरपंच केशर उत्तम जाधव, तेव्हापासूनचे ग्रामसेवक फिरोजखान पठाण, व्ही.एस. साळुंखे, ए.एन. शेंडे, श्रीमती आर.बी. पर्वते या प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर कदम यांच्याच फिर्यादीवरून इंदापूरातील वकील राजेंद्र शंकर सोमवंशी, पृ्थ्वीराज राजेंद्र सोमवंशी, जयश्री राजेंद्र सोमवंशी, शरद ज्ञानदेव कदम, भारत शंकर सोमवंशी, कै. भगवान मारुती कदम, गणेश भिवाजी जाधव यांच्याविरोधातही फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, हनुमंत कदम हे गलांडवाडी नंबर १ मधील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील वसंत संभाजी कदम यांच्या नावाने गावात मिळकत होती. संबंधित वकील व त्यांच्या नातेवाईकांची या मिळकतीशेजारी मोठी इमारत आहे. हनुमंत कदम यांची जागा बळकावून हाकलून देण्यासाठी कदम यांना बेदम मारहाण करण्यात आली अशी कदम यांची तक्रार होती. शरद कदम यास पुढे करून राहत्या जागेमधून जबरदस्तीने रस्ता करण्यासाठी दिवाणी कोर्टात दावा दाखल करायला लावला.
तर त्यानंतर कदम यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी माणिक बिचकुले यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा तत्कालीन विस्तार अधिकारी जी.एम. दराडे याने कदम यांच्या अपरोक्ष जुजबी चौकशी करून कदम यांची बखळ जागा नसल्याचा, त्या जागेतून १२ फूट रस्ता असल्याचे व मिळकतीमध्ये खाडाखोड असल्याचा अहवाल दिला आणि येथूनच कदम यांच्या संघर्षाला सुरवात झाली.
दराडे यांच्या चुकीच्या अहवालामुळे कदम यांना सातत्याने फौजदारी व दिवाणी खटल्यांना व गुन्ह्यांना सामोरे जावे लागले. माणिक बिचकुले यांनीदेखील दराडे याचा हा अहवाल मान्य केला. सन २०१४ मध्ये शरद कदम व संबंधितांनी ग्रामसेवक फिरोजखान पठाण याच्याशी संगनमत करून २००६-०७ च्या कर आकारणी रजिस्टरला मिळकतीत ३५२ चौरस फूटाची नोंद केली. त्यानंतर दीड गुंठे जागा व ३५२ चौरस फूट अशी नोंद वाढवली.
त्यामुळे सोमवंशी कुटुंबियांनी आपल्या जागेत अतिक्रमण केल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. त्यानंतर अश्विनी नारायण झेंडे या तत्कालिन ग्रामसेविकेने पुन्हा २००६-०७ च्या मिळकत रजिस्टरला बनावट नोंद करून २०१२ मध्ये २७६८ चौरस फूटाचा उतारा तयार केला व ती जागा भगवान मारुती कदम यांच्याकडीन खरेदी करून त्यामध्ये इमारत बांधून ती पांडूरंग फलफले यांना विक्री केली.
एकाच मिळकतीतील जागा ३५२ चौरस फूटावरून वेळोवेळी वाढवत ती २७६८ चौरस फूटापर्यंत नेली आणि त्यातून शासनाची वेळोवेळी फसवणूक करण्यात आल्याची तक्रार कदम यांनी केली होती. त्यानंतर कदम हे २०१४ पासून सातत्याने शासनाशी संघर्ष करीत होते.
भगवानचा जन्म १९३६ चा आणि जागेची नोंद मात्र १९३३ची…!
याच गावातील आणखी एक गंमत म्हणजे तत्कालीन ग्रामसेवक व्ही.एस. साळुंखे यांनी कै. भगवान कदम व भारत सोमवंशी यांचा फायदा व्हावा या हेतूने मूळ मिळकत ५५० चौरस फूटाची असताना खोटा दस्त बनवून गावठाणातील अकृषी महसूली नोंदवहीत या जागेची तब्बल १० गुंठे नोंद केली. विशेष म्हणजे ही नोंद करताना ती १० जानेवारी १९३३ मध्ये भगवान कदम यांच्या नावे केली.
मात्र गंमतीचा भाग असा की, भगवान यांचा जन्मच मुळी १५ ऑक्टोबर १९३६ रोजी झालेला असल्याचे शाळेच्या दाखल्यावर नोंदीत असल्याने कदम यांनी याचीही माहिती शासनास म्हणजे गटविकास अधिकाऱ्यास दिली होती. मात्र तेथेही कदम यांचे म्हणणे कोणीच ग्राह्य धरले नाही. त्यामुळे गावातील नियमबाह्य कामे, आर्थिक गैरव्यवहार याविषयी हनुमंत कदम सातत्याने शासनाशी सनदशीर मार्गाने लढा देत होते.
गुन्हा दाखल, मात्र पुढे काय?
अर्थात कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा तर दाखल झाला आहे. अर्थात ग्रामपंचायतीच्या स्तरावर होत असलेल्या अशा चुकीच्या गोष्टींचा प्रत्यक्ष सामना करताना स्थानिक स्तरावर सामान्य नागरिकांना फार त्रास होतो. एखादाच वसंत कदम तयार होतो आणि तो व्यवस्थेशी लढतो. आता देखील गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
मात्र जेवढी तत्परता इतर गुन्ह्यांमधील तपासासाठी पोलिस दाखवतात, तेवढी तत्परता याही गुन्ह्यात दाखवतील का? हा प्रश्नच आहे. पोलिसांनी जर या प्रकरणात प्रामाणिकपणे व तत्परतेने आरोपींना जेरबंद करण्याची भूमिका घेतली, तरच सामान्यांचा व्यवस्थेवर विश्वास राहील..
अन्यथा पुन्हा आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी १६ वर्षे लढण्याची तयारी कदम यांना दाखवावी लागेल.. थोडक्यात एका गावातील चुकीच्या व्यवस्थेविरोधात न्याय मागण्यासाठी त्यांना अख्खे आयुष्य घालवावे लागेल..!