विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आज अशी एक घटना घडली, ज्यामध्ये एका बाळाने अचानक दुध पिणे बंद केल्याने डॉक्टरांना दाखवले असता डॉक्टरांनी क्ष- किरण तपासणी केली, तेव्हा या बाळाने चक्क पायातील जोडवे गिळल्याचे समोर आले. डॉ. सौरभ मुथा यांचे अचूक निदान आणि डॉ. सौरभ निंबाळकर यांनी वेळेवरच शस्त्रक्रिया केल्याने या बाळाच्या पोटातील जोडवे बाहेर काढले.
या बाळाच्या पोटात गॅस झाला असेल म्हणून सुरवातीला पालकांना वाटले, मात्र त्यानंतर श्वास घ्यायला या बाळाला त्रास जाणवू लागल्याने पालकांनी बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे नेले. तेव्हा सौरभ मुथा यांनी सुरवातीला काही प्राथमिक तपासण्या करून क्ष किरण तपासणीचा सल्ला दिला. क्ष किरण तपासणीनंतर या बाळाच्या पोटात जोडवे असल्याचे दिसून आले.
त्यानंतर या बाळाला डॉ. सौरभ निंबाळकर यांच्या दवाखान्यात नेऊन त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये दुर्बिणीद्वारे बाळाच्या घशात अडकेलेले जोडवे बाहेर काढण्यात आले. यापूर्वी देखील बारामतीत सहा महिन्याच्या बाळाने गिळलेला मासा सुरक्षितरित्या डॉक्टरांनी बाहेर काढला होता.