बारामती महान्यूज लाईव्ह
बारामतीत उगीचच वाहन चालविण्याचा परवाना नसताना शायनिंग मारणाऱ्यांपैकी आज जे सापडले त्यांची पुरती फजिती शहर पोलिसांनी केली. उगीचच रोडरोमिओगिरी करणारी ही टवाळखोर पोरं पोलिसांच्या हातात सापडली, तेव्हा त्यांच्याकडे वाहन चालविण्याचे परवानेच नसल्याचे समोर आले. त्यामुळे शहर पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोरांना चांगलाच हिसका दाखवला.

गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांच्या परिसरात वेगाने दुचाकी चालवित, स्टंट करणारे अनेकजण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मुली दिसताच कट मारणे, उगीचच जोरात ओरडत दुचाक्या चालविणारे सडकसख्याहारी आज पोलिसांनी शोधायचे ठरवले. आज दुपारी शहर पोलिसांनी अगदी ठरवूनच सापळा रचला आणि कॉलेज आवारात फिरणाऱ्या बड्या बापांची ही टवाळखोर पोरं शोधून काढली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील बहुतांश जणांना वाहन चालविण्याचे परवानेच नव्हते असे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या्ंच्यावर कारवाई केली.
लायसन विनाकारण फिरणाऱ्या मुलांवर कारवाई केल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. बारामती शहरात दुपारी व सायंकाळी अशा दोन शिफ्ट मध्ये बरीच महाविद्यालये भरतात. मात्र या महविद्यालयांच्या सुटण्याच्या वेळा बरोबर गाठून काहीजण रोडरोमिओगिरी करतात. विना नंबरची दुचाकी वाहने या परिसरात फिरतात, शिवाय वाहनांच्या सायलेन्सरचा जोराचा आवाज काढून ती चालविण्यामुळे परिसरातील लोकांनाही त्याचा त्रास होतो.
निर्भया पथकांनी वेळोवेळी कारवाई करूनही त्यांची सवय काही केल्या सुटत नसल्याने आज एकाच वेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक घोडके , मोटे, पाटील यांची चार पथके तयार करून वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या ठिकाणी तैनात केली. टीसी कॉलेज, अनेकांत इंग्रजी माध्यम शाळा, राधेश्याम आगरवाल हायस्कूल, रमाकांत शाळा, शाहू हायस्कूल, धों. आ. सातव विद्यालय या ठिकाणी पोलिसांनी साध्या गणवेशात जाऊन ही पथके थांबली.
दुपारी तीन वाजता या पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दबा धरून बसून कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर कारवाई केली . या बाबत शिक्षकांनी माहिती देऊन त्या मुलांच्या पालकांनाही याची माहिती देण्यात आली. ज्या मुलांना या विना क्रमांकाच्या दुचाक्या ताब्यात दिल्या, त्या पालकांवरही पाच हजारांचा दंड पोलिस करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.